भोर तालुका: पोरांनी आई-बापाचं नाव मोठं केलं; थोरला PSI तर धाकटा बनला बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता

नसरापूर: भोर तालुक्यातील नसरापूर आणि वाजेघर गावात आनंदाचे वातावरण आहे. शिळीमकर कुटुंबातील दोन भावंडांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवत गावाचा गौरव वाढवला. थोरला भाऊ अमित शिळीमकर याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून निवड झाली, तर धाकटा भाऊ अविनाश शिळीमकर याने सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) सहाय्यक अभियंता पद मिळवले.
मूळचे वाजेघरचे रहिवासी सुभाष शिळीमकर यांचे कुटुंब नोकरीनिमित्त नसरापूर येथे स्थायिक आहे. अमितने याआधी बँकेत नोकरी स्वीकारली होती, पण पोलिस वर्दीची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने बँकेतील नोकरी सोडून मेहनतीने PSI पदाचे स्वप्न पूर्ण केले.
धाकटा अविनाश यानेही एम.टेक. (सिव्हिल) पूर्ण केल्यानंतर पुण्यात स्वतः अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात MPSC परीक्षेत यश मिळवले आणि सहाय्यक अभियंता म्हणून नियुक्ती मिळवली.
अविनाश शालेय जीवनापासून अभ्यासू आणि चिकाटीचा होता, नेहमी पहिल्या तीन क्रमांकांत राहिला. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, बहीण अश्विनी जाधव आणि विश्वनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाला दिले. “कठीण परिस्थितीत संघर्षाची शिकवण मला आई-वडिलांकडून मिळाली,” असे तो म्हणाला.
या दुहेरी यशाने नसरापूर आणि वाजेघरात अभिमानाचे वातावरण आहे. ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रांनी दोघांचा सत्कार करत शुभेच्छांचा वर्षाव केला. शिळीमकर भावंडांनी मेहनत, जिद्द आणि कुटुंबाच्या पाठबळाने दाखवून दिले की, चिकाटीने कोणतेही शिखर गाठता येते.





