शेतकऱ्यांसाठी सोमेश्वर फाउंडेशनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

पुणे : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशन आणि सनीज फूड्स यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सनी विनायक निम्हण यांनी हा धनादेश दिला.
सोमेश्वर फाउंडेशन आणि सनीज फूड्स यांच्या वतीने दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दर्जेदार फराळ सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला जातो. “ना नफा, ना तोटा” या तत्वावर चालणाऱ्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतो. या फराळ विक्रीतून जमा झालेल्या रकमेतील काही हिस्सा मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय निम्हण कुटुंबाने घेतला होता. नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने हा निर्णय प्रत्यक्षात उतरला.
धनादेश स्वीकृत करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि सोमेश्वर फाउंडेशनच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या, अशी माहिती सनी विनायक निम्हण यांनी दिली.





