Satara : शिरवळचा लौकिक वाढविणारा घनकचरा प्रकल्प दिशादर्शक

खंडाळा : शिरवळ समृध्दी अंतर्गत असलेला घनकचरा प्रकल्प व शिरवळचे सरपंच रविराज दुधगावकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून दूरदृष्टी ठेवून उभारलेला प्रकल्प दिशादर्शक असून शिरवळचा नावलौकिक वाढविणारा आहे, असे मत राजस्थानमधील अल्वर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव साळुंखे यांनी व्यक्त केले.
राजस्थानमधील पंचायत राज विभाग व महाराष्ट्राचे राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत अभ्यास दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिरवळ (ता. खंडाळा) येथे सरपंच रविराज दुधगावकर यांच्या संकल्पनेतून सेंटर फाँर एन्व्हायरमेंट एज्युकेशन व एसीजी केअर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विदयमाने उभारण्यात आलेल्या कचरा व्यवस्थापन व कचरा निर्मूलन प्रकल्पाला दिलेल्या भेटीप्रसंगी साळुंखे बोलत होते.
याप्रसंगी श्री गगननगर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरधर, भरतपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्रीदुल सिंग, अभियंता नंदकुमार लखिवाल, सातारा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने- भोसले, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाशकुमार बोंबले, विस्तार अधिकारी सनील बोडरे, उपअभियंता संजय लाड, सरपंच रविराज दुधगावकर, उपसरपंच अमोल कबुले, ग्रामपंचायत सदस्य राहुल तांबे, संग्राम देशमुख, ग्रामपंचायत अधिकारी बबनराव धायगुडे आदी उपस्थित होते. यावेळी सरपंच रविराज दुधगावकर यांनी शिरवळ समृध्दी घनकचरा प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
शिरवळकरांच्या शाश्वत विकासासाठी राबवलेल्या उपाययोजनांची परराज्यात दखल घेतली जात आहे, हे पाहून केलेली विकासकामे सार्थ ठरली असल्याची प्रचिती येत आहे. यापुढेही शिरवळच्या सर्वांगीण विकासासाठी मी व माझे सहकारी सदैव कटिबद्ध आहोत.
– रविराज दुधगावकर (लोकनियुक्त सरपंच, शिरवळ)





