Solar power: 20 लाख घरांवर सौरऊर्जा, पुढील टार्गेट 50 लाख! कधी होणार पूर्ण? वाचा सविस्तर

Solar power: अक्षय ऊर्जा निर्मिती वाढावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून पीएम सूर्य घर मुक्त बिजली योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत देशभरात वीस लाख घरांच्या छतावर सौरऊर्जा व्यवस्था करण्यात आली आहे आणि लवकरच ही संख्या 50 लाखापर्यंत पोहोचेल असा दावा केंद्रीय अक्षय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला आहे.
मात्र नेमक्या किती कालावधीत ही संख्या 50 लाख होणार आहे असे पत्रकारांनी विचारले असता याबाबत वेळापत्रक देण्यास त्यांनी नकार दिला. राज्यांच्या अक्षय ऊर्जा मंत्र्यांबरोबर जोशी यांनी या विषयावर चर्चा केली. या योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर बोलताना जोशी यांनी सांगितले की ही योजना कमालीच्या वेगाने देशभरात राबविली जात आहे.
त्याचबरोबर ज्या लोकांच्या घरावर छत नाही अशासाठी ही सौर ऊर्जा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी वेगळी यंत्रणा विकसित करून ती उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही राज्यांनी या योजनेची अंमलबजावणी वेगात करण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये आंध्र प्रदेशाचा समावेश आहे. जेवढी जास्त मागणी तेवढा जास्त पुरवठा या पद्धतीने ही योजना अंमलात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सध्या देशात 251 गिगा वॅट वीज निर्मिती अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून केली जात आहे. आणखी पाच वर्षात एवढीच वीज निर्मिती अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारबरोबर राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या क्षेत्रात 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून 12,700 लोकांना रोजगार मिळाला आहे.





