Pimpri : नक्षत्रम सोसायटीत सौरउर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित

चिंचवड : येथील प्रेमलोक पार्कमधील नक्षत्रम (एन विंग) सहकारी गृहरचना संस्थेकडून उभारण्यात आलेला ४५ किलो वॅट सौरउर्जा निर्मिती प्रकल्प नुकताच कार्यान्वित करण्यात आला. महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिवाकर देशमुख आणि सहाय्यक अभियंता प्रणोती पाटील यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले.
यावेळी देशमुख म्हणाले, सर्व सभासदांनी या प्रकल्पाकडे खर्च म्हणून न पाहता ती संस्थेची एक गुंतवणूक म्हणून पहावे. निसर्गाचे संवर्धन करण्याचे काम संस्थेने केले आहे. त्याबद्दल, सर्व सभासदांचे अभिनंदन.
पुढील काळात संस्थेने अजून पर्यावरणपूरक प्रकल्प हाती घेऊन उत्कृष्ट रितीने पूर्ण करण्यासाठी महावितरणचे सहकार्य नेहमीच लाभेल आणि संस्थेने एक आदर्श म्हणून इतर संस्थांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन पाटील यांनी केले. नक्षत्रम एन विंग संस्थेचे अध्यक्ष संदीप शिंदे प्रास्ताविकात म्हणाले की, या प्रकल्पामुळे आमच्या वीज बिलामध्ये मोठी बचत होणार आहे.
तसेच हरित ऊर्जेला देखील चालना मिळणार आहे. पुढील काळात एक आदर्श संस्था निर्माण करू. संस्थेच्या सचिव अश्विनी पाटील यांनी आभार मानले. खजिनदार रश्मी ढेरे, धवल गोयल, विराल ठक्कर, राजेंद्र क्षीरसागर यांनी संयोजन केले. उदय चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.





