Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरच्या अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत याना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर संशयित प्रशांत कोरटकरने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
आज सोमवारी (दि. २४) आव्हान अर्जावर न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्यासमोर सुनावणी होत आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या बाजूने सरकारी वकिलांसह ज्येष्ठ विधिज्ञ असिम सरोदे युक्तिवाद करून आव्हान अर्जावर हरकत नोंदविणार आहेत. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे तपास पथकही रविवारी मुंबईकडे रवाना झाले आहे.
न्यायालयाने कोरटकरचा अर्ज फेटाळला
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत याना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरविरुद्ध कोल्हापूर व नागपूरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. कोरटकरच्या अटकेसाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने कोरटकरचा अर्ज फेटाळला.
मुंबई उच्च न्यायालयात धाव
प्रशांत कोरटकरने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्यासमोर आव्हान अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. सुनावणीसाठी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश पाटील, सतीश भामरे यांचे पथक रवाना झाले आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकिल तसेच इंद्रजित सावंत यांच्या बाजूने अॅड. असिम सरोदे, अॅड. हेमा काटकर,अॅड. श्रीया आवले, अॅड. पल्लवी थोरात, अॅड. योगेश सावंत युक्तिवाद करणार आहेत; तर कोरटकरच्या वतीने सौरभ घाग बाजू मांडणार आहेत.
प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोलीकडे रवाना झालेले, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह पथकाने तेथील काही हॉटेल्सची तपासणी केली. चंद्रपूर येथील एका हॉटेलमध्ये कोरटकरने एक दिवस आश्रय घेतल्याचे फुटेजही पथकाला आढळले. पंचनामा करून फुटेज पोलिसांनी हस्तगत केले आहे.





