देशातील सामाजिक सलोखा बिघडला : पृथ्वीराज चव्हाण
पिंपरी – नागरिकत्व संशोधन कायदा रद्द करावा ही नागरिकांची व सर्व विरोधी पक्षांची मागणी आहे. त्यानिमित्त जनजागृती करण्यासाठी “गांधी शांती यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. महात्मा गांधी आफ्रिकेतून आल्यानंतर 9 जानेवारीला गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे आगमन झाले होते. त्या दिवसाचे औचित्य साधून गांधी शांती यात्रा सुरू करण्यात आली आहे.
आर्थिक आघाडीवर मोदी सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. गेली सहा वर्ष जीडीपी दर घसरत चालला आहे. त्यावरील नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नागरिकत्व हक्क सुधारणा कायदा व सीएए कायदा सरकारने आणला आहे, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली.
गुरुवारी (दि.9) मुंबई येथून निघालेल्या “गांधी शांती यात्रेचे’ स्वागत निगडी येथे पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, मारुती भापकर, संग्राम तावडे यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यशवंत सिन्हा म्हणाले, जेएनयूमधील झालेल्या हिंसक घटनेबाबत देशभर विद्यार्थी व युवकांमध्ये तीव्र असंतोष आहे. सरकारच्या मनमानी कारभाराविरुद्ध युवकांनी आवाज उठविलाच पाहिजे. यासाठी जनजागृती करण्यासाठी तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून सहा राज्यातून ही यात्रा 30 जानेवारीला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिवशी दिल्लीत पोहचेल.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशातील सामाजिक सलोखा बिघडला आहे. केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. नागरिकांना संघटित करून शांततेच्या मार्गाने ही यात्रा जनजागृती करणार आहे.





