Anna Hazare : ‘मी कधीही कोणत्याही पक्षाच्या जवळ गेलो नाही’; सोनिया गांधींच्या पुस्तकातील दाव्यावर अण्णा हजारे यांचे प्रत्युत्तर
Anna Hazare :काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या नव्या पुस्तकात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ऐतिहासिक जनलोकपाल आंदोलनामागे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) छुपा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे.

Anna Hazare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाबाबत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीतील आंदोलनाला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) छुपा पाठिंबा असल्याचा उल्लेख पुस्तकात असल्याचे सांगितले जात आहे. या दाव्यावर अण्णा हजारे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. (Anna Hazare )
‘मी पक्ष-पार्टीचा कधी विचारच केला नाही’
या वादावर बोलताना अण्णा हजारे म्हणाले, “कोण काय म्हणतोय किंवा राजकीय पक्ष-पार्ट्या काय बोलतात, यापेक्षा समाज आणि देश काय मानतो, हे अधिक महत्त्वाचे आहे. मी कधीही कोणत्याही पक्षाचा किंवा पार्टीचा विचार केला नाही आणि त्यांच्या जवळही गेलो नाही.” (Anna Hazare )
पुढे ते म्हणाले, “माझी कोणी निंदा करतो की वंदन करतो, याची मी कधीही चिंता करत नाही. आपण समाज आणि देशाचे काम प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे.” तसेच, “ज्या रंगाचा चष्मा लावावा, त्याच रंगाचे जग दिसते. त्यांचा चष्माच तसा असल्याने त्यांना तसेच दिसणार,” असा टोला त्यांनी नाव न घेता लगावला. (Anna Hazare )
आपण आयुष्यभर देश आणि समाजाचाच विचार केला असून, त्यामुळेच लोकांच्या मनात आपल्याबद्दल प्रेम आणि आस्था असल्याचेही अण्णांनी सांगितले. (Anna Hazare )
संजय शिरसाट काय म्हणाले?
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, तो काळ वेगळा होता. त्यावेळी ‘मी अण्णा हजारे’ अशा टोप्याही बाजारात उपलब्ध झाल्या होत्या. मात्र, या आंदोलनामागील सत्यता कोणी पडताळून पाहिली नाही. त्या काळात आणखी काय घडले, याचा वेगळा इतिहास आहे. तो इतिहास उकरून काढत बसलो, तर प्रत्येक नेत्यावर टीका होईल, असे ते म्हणाले. (Anna Hazare )
अंबादास दानवेंचा अण्णा हजारेंना सवाल
दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील दाव्याचे समर्थन केले. त्यांनी अण्णा हजारे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. (Anna Hazare )
दानवे म्हणाले की, अण्णा हजारे यांना पुढे करून देशात अराजकता निर्माण करणे आणि त्याच्या माध्यमातून स्वतःचा राजकीय फायदा करून घेणे, हे एक षड्यंत्र होते. हा मुद्दा देशासमोर आल्यानंतर अण्णा हजारे यांनी त्यावर भूमिका का मांडली नाही? २०१४ नंतर त्यांनी या विषयावर कधीही स्पष्टपणे भाष्य केले नाही, असा आरोप दानवे यांनी केला. (Anna Hazare )
तसेच, त्या काळात अण्णा हजारे जे बोलत होते, ते त्यांच्या स्वतःच्या विचारांतून होते की त्यांच्याकडून कोणीतरी बोलून घेत होते, असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला. सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील दावे, अण्णा हजारे यांचे प्रत्युत्तर आणि त्यावरून सुरू झालेली नेत्यांची टीका यामुळे हा विषय पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. (Anna Hazare )





