Daund : अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी
Daund : धायगुडेवाडी चौफुला परिसरातील वन विभागाच्या पाणवठ्यांवर वन्यजीवांसाठी पाण्याचे टँकर सोडण्यात आले.

खुटबाव : आमदार राहुल कुल यांचा ४९ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त केक, हार-तुरे व फ्लेक्स यांवरील अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत धायगुडेवाडी चौफुला येथील स्व. तुकाराम खंडू अण्णा धायगुडे स्मृती फाउंडेशनच्या वतीने तालुक्याचे युवा नेते अभिषेक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
धायगुडेवाडी चौफुला परिसरातील वन विभागाच्या पाणवठ्यांवर वन्यजीवांसाठी पाण्याचे टँकर सोडण्यात आले. धायगुडेवाडी येथील काकासाहेब थोरात विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी, देऊळगाव गाडा येथील सद्गुरू विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विठ्ठलवाडी येथील शाळा व अंगणवाडी, सुपा येथील प्राजक्ता मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ हजार १११ रुपयांचा धनादेश आमदार कुल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. उच्च शिक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्याला लॅपटॉप भेट देण्यात आला. या सामाजिक उपक्रमांमधून वाढदिवस साजरा करण्याची एक विधायक आणि समाजोपयोगी परंपरा जपण्यात आली. याप्रसंगी अभिषेक थोरात, धायगुडेवाडीतील ग्रामस्थ, स्व. तुकाराम खंडू अण्णा धायगुडे साहेब स्मृती फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





