सामाजिक : आरोग्यावर मूक हल्ला
अन्न हा केवळ व्यापाराचा विषय नसून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे. ही समस्या अशीच राहिल्यास आपल्या ताटातील अन्न हे पोषणाचे साधन न राहता आजारांचे निमंत्रण ठरण्याचा धोका कायम राहील.

– प्रा. दयानंद जाधवर
अन्न हा केवळ व्यापाराचा विषय नसून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे. ही समस्या अशीच राहिल्यास आपल्या ताटातील अन्न हे पोषणाचे साधन न राहता आजारांचे निमंत्रण ठरण्याचा धोका कायम राहील.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अनेकदा आरोग्याची काळजी घेत असल्याचा समज करून घेतो. सकाळच्या चहात साखर कमी करतो, व्यायाम करतो, महागडे प्रोटीन सप्लिमेंट्स घेतो, डॉक्टरांचा सल्ला पाळतो. पण या सर्व प्रयत्नांनंतरही एक प्रश्न कायम राहतो, आपण जे खातो ते खरोखर अन्न आहे की रसायनांचे मिश्रण? महाराष्ट्रात अलीकडेच अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर सुरू केलेल्या धाडसत्रामुळे अनेक धक्कादायक वास्तव समोर येत आहेत.
पुण्यासह राज्यातील विविध भागांमध्ये खवा, पनीर, तूप, दूध, खाद्यतेल, कृत्रिम रंग मिसळलेला आंबा आणि इतर संशयित खाद्यपदार्थांचे लाखो रुपयांचे साठे जप्त करण्यात आले. काही ठिकाणी बनावट दूधनिर्मिती केंद्रे, अस्वच्छ पनीर कारखाने आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थ तयार करणार्या यंत्रणांवरही कारवाई झाली. या कारवाया पाहताना सामान्य नागरिकाच्या मनात एक प्रश्न उभा राहतो, आपण रोज जे खातो ते खरोखर अन्नच आहे का?
गेल्या काही दशकांपासून आपण भेसळीच्या बातम्या वाचत आलो आहोत. कधी दुधात पाणी मिसळल्याचे उघड होते, कधी सिंथेटिक दूध तयार करणार्या टोळ्या पकडल्या जातात, तर कधी खवा, पनीर, तूप आणि मिठाईमध्ये निकृष्ट पदार्थ मिसळल्याचे समोर येते. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील कारवाईत कोट्यवधी रुपयांचे भेसळयुक्त दूध, पनीर, तूप व दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या अहवालांमध्ये काही नमुने मानवाच्या आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचे आढळून आले.
एकेकाळी आपल्या घरातील गाय-म्हशीच्या दुधापासून तयार होणारे लोणी, तूप आणि ताक ही आरोग्याची प्रतीके मानली जात होती. आज त्याच दूधसाखळीबद्दल संशय निर्माण होऊ लागला आहे. शहरातील ग्राहकाला दूध, पनीर, चीज, आइस्क्रीम, दही आणि मिठाई यांचे आकर्षक पॅकेज दिसते; पण त्या पॅकेजच्या मागे गुणवत्ता आहे की भेसळ, हा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे.
आज परिस्थिती अशी आहे की सकाळच्या चहातील साखरेपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येक पदार्थाबाबत ग्राहकाला सतर्क राहावे लागत आहे. भारतातील अन्नबाजार झपाट्याने बदलत आहे. उत्पादन वाढविण्याची स्पर्धा, कमी खर्चात अधिक नफा मिळविण्याची मानसिकता आणि ग्राहकांच्या आकर्षकतेचा फायदा घेण्याची प्रवृत्ती यामुळे अन्नाच्या गुणवत्तेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. आज बाजारात मिळणारे अनेक खाद्यपदार्थ पूर्वीच्या नैसर्गिक स्वरूपापेक्षा अधिक चमकदार, अधिक रंगीत आणि अधिक काळ टिकणारे झाले आहेत. पण या आकर्षकतेची किंमत अनेकदा ग्राहकांच्या आरोग्याला मोजावी लागत आहे.
अन्न भेसळ हा भारतासाठी नवीन विषय नाही. पूर्वी दुधात पाणी मिसळणे, मसाल्यांमध्ये निकृष्ट पदार्थ मिसळणे किंवा धान्यात भेसळ करणे एवढ्यापुरती ही समस्या मर्यादित होती. मात्र आधुनिक अन्न उद्योगाच्या विस्तारानंतर भेसळीचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. अनेक वेळा भेसळ डोळ्यांना दिसत नाही; ती केवळ प्रयोगशाळेतील तपासणीतच उघड होते.
दूध, तेल, मसाले, मिठाई, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि फास्ट फूड यांमध्ये विविध रसायनांचा वापर होत असल्याच्या घटना वेळोवेळी समोर येतात. काही प्रकरणांमध्ये हळदीत कृत्रिम रंग, तिखटात रंगद्रव्ये, मिठाईमध्ये निकृष्ट दर्जाचे घटक किंवा तेलामध्ये पुनर्वापराचे प्रमाण आढळले आहे. अशा घटना अपवादात्मक असल्या तरी त्या ग्राहकांच्या विश्वासाला तडा देणार्या आहेत.
नॉनव्हेज उद्योगाबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. पोल्ट्री उद्योगातील प्रतिजैविकांचा वापर, पशुखाद्याची गुणवत्ता, तसेच मत्स्यव्यवसायात साठवणूक आणि वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्या पद्धती यांबाबत सातत्याने चर्चा होत असते. काही राज्यांमध्ये माशांमध्ये फॉर्मेलिनसारखे रसायन आढळल्याच्या घटनांनी ग्राहकांची चिंता वाढविली होती. सर्व उत्पादक किंवा सर्व विक्रेते दोषी आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल; मात्र अशा घटना अन्नसुरक्षेच्या व्यवस्थेतील त्रुटी अधोरेखित करतात.
फास्ट फूड संस्कृतीने हा प्रश्न आणखी गुंतागुंतीचा केला आहे. चटकदार चव, आकर्षक रंग आणि त्वरित उपलब्धता यामुळे प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन वाढले आहे. वारंवार वापरलेले तेल, जास्त मीठ, जास्त साखर आणि जास्त चरबी असलेले पदार्थ दीर्घकालीन आरोग्य समस्यांना निमंत्रण देऊ शकतात. मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या जीवनशैलीजन्य आजारांमध्ये वाढ होत असल्याची नोंद आरोग्य तज्ज्ञ सातत्याने करीत आहेत.
या समस्येचा दुसरा पैलू म्हणजे अर्थकारण. अन्न उद्योग हा लाखो कोटी रुपयांचा व्यवसाय आहे. त्यामुळे गुणवत्ता नियंत्रण, तपासणी आणि नियमांची अंमलबजावणी ही मोठी जबाबदारी बनते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (ऋडडअख) तसेच राज्य यंत्रणा काम करत असल्या तरी देशाच्या विशाल आकारमानामुळे तपासणी यंत्रणेवर मोठा ताण आहे. परिणामी ग्राहकांची जागरूकता हीच पहिली संरक्षणरेषा ठरते.
आज गरज आहे ती भीती निर्माण करण्याची नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याची. प्रत्येक चमकदार वस्तू गुणवत्तापूर्ण असेलच असे नाही आणि प्रत्येक प्रक्रिया केलेला पदार्थ विषारी असेलच असेही नाही. मात्र ग्राहक म्हणून आपण अधिक सजग होणे आवश्यक आहे. स्थानिक, ताज्या अन्नपदार्थांना प्राधान्य देणे, अन्नपदार्थांवरील लेबले वाचणे, प्रमाणित उत्पादने वापरणे व अनावश्यक प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन कमी करणे ही काळाची गरज आहे.
आर्थिक विकासाचा खरा अर्थ नागरिकांचे आरोग्य सुरक्षित असणे हा आहे. जर ताटातील अन्नच संशयाच्या भोवर्यात अडकले असेल, तर विकासाची आकडेवारी व जीडीपी वाढ सामान्य माणसासाठी कितपत अर्थपूर्ण ठरेल? म्हणूनच अन्नसुरक्षा ही केवळ आरोग्याची नव्हे तर आर्थिक विकास, मानवी भांडवल आणि सामाजिक न्यायाचीदेखील बाब आहे. निरोगी भारताचा पाया रुग्णालयात नव्हे, तर शुद्ध अन्नाच्या ताटात आहे.





