साबण आणि पाम तेल महागले

नवी दिल्ली – जागतिक बाजारात पाम तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे भारताला ही आयात महागात पडत आहे. त्याचबरोबर रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळेही आयात जास्तच महागात पडत आहे. अशा परिस्थितीत देशात पाम तेलाच्या किमती वाढल्या आहेत. या तेलाचा वापर करून तयार करण्यात येत असलेल्या साबणाच्या किमतीतही सात ते आठ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय साबण उत्पादकांनी घेतला आहे.
विप्रो कंजूमर केअर या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरज खत्री यांनी सांगितले की, साबण तयार करताना पाम ऑइलचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. या वर्षाच्या सुरुवातीपासून पाम तेलाच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत दरवाढ करण्याशिवाय आमच्याकडे कसलाही पर्याय शिल्लक नाही. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने हे पाम तेलावरील आयात शुल्क वाढविले आहे. पाम तेल मलेशिया मधून खरेदी केले जाते. पाम तेलाच्या किमती सध्या 1,370 रुपये प्रति किलो या पातळीवर आहेत.
हिंदुस्तान युनिलिव्हर आणि टाटा कंजूमर या कंपन्यांनी चहाच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. चहा निर्माण करणार्या प्रदेशांमध्ये अवकाळी पावसामुळे चहाचे उत्पादन कमी झाले आहे. कॉफी आणि कोकाच्या किमतीही वाढविण्यात येणार आहेत.
ताळेबंदावर परिणाम
विशेष म्हणजे साबण आणि पामतेलासह इतर बहुतांश ग्राहक उपयोगी वस्तूच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे शहरातून या वस्तूची विक्री कमी झाली आहे. अशा परिस्थितीत विक्रीवर जास्त परिणाम होऊ नये यासाठी आम्ही हळूहळू किमतीत वाढ करणार असल्याचे काही कंपन्यांच्या अधिकार्यांनी सांगितले. या कंपन्यांची विक्री कमी झाल्यामुळे दुसर्या तीमाहीचे ताळेबंद कमी नफादायक आहेत. यामुळे या कंपन्यांच्या शेअर किमतीवरही बराच परिणाम झाला आहे.





