“…म्हणून सुप्रियाने मला अमिताभ बच्चन म्हंटल असेल” अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई – शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवारांना थेट सरकारमध्ये सामील होण्याची ऑफर दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दादांना ‘अमिताभ बच्चन’ यांची उपाधी देत ते सर्वांना हवे हवेसे वाटत असल्याचे म्हंटले. यानंतर आता अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या विधानावर भाष्य केलं आहे.
केसरकरांनी थेट सरकारमध्ये सामील होण्याची अजित पवार यांना ऑफर दिल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या,”अमिताभ बच्चन हे सगळ्यांनाच सिनेमात हवे असतात. कारण सिनेमात त्यांचा आवाज चालतो, चेहरा चालतो, अभिनय चालतो, इतकेच काय त्यांची स्वाक्षरीही चालते. त्याचप्रमाणे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. ते सर्वांनाच हवे असतात. त्यात वाईट काय”. यावर बोलताना अजित पवार म्हणाले,”भावाच्या पेमापोटी सुप्रियाने मला अमिताभ बच्चन म्हंटल असेल.
माझी बहीण आहे.. म्हणाली असेल,तेवढं मनावर घेऊ नका. असं आज पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी म्हंटल. तसेच राजकारणात काम करत असतांना मी कधीही ‘एँग्री यंग मॅन’चा तोरा दाखवलेला नाही. हो ला हो आणि नाही ला नाही म्हणायचं, ही आपली कामाची पद्धत आहे. असही अजित पवार यावेळी म्हणाले.
दीपक केसरकरांनी नेमकी काय ऑफर दिली होती
शिवसेनेचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी अजित पवार यांना सरकारमध्ये सहभागी होण्याची खुली ऑफर दिली होती.अजित पवार एक कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षात काय होत आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत येऊन सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे मत केसरकरांनी व्यक्त केले होते.





