“आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत संयमाने बोललो पण…”; संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बारसू या ठिकाणी प्रस्तावित असणाऱ्या रिफायनरी प्रकल्पावरून सध्या कोकणात गोंधळ निर्माण झाला आहे. नागरिक आणि प्रशासन यांच्यात सध्या कोलाहल सुरु आहे. इथले नागरिक या प्रकल्पाला विरोध करत आहेत. तर प्रशासनाकडून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान, यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या समोर आले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकल्पावर सरकारची भूमिका स्प्ष्ट केल्यानंतर आता शिवसेना( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. याविषयी बोलताना,”फडणवीसांनी सुपाऱ्या घेऊन बोलू नये. महाराष्ट्रात शिवसेनेला सुपारी घेण्याची गरज भासली नाही. शिवसेना फोडायची गरज कोणाला पडली? तुमच्यात हिंमत असेल तर समोर या, सुपारी घेऊन हल्ले करू नका. आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत संयमाने आम्ही विधाने केली. पण तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर लक्षात घ्या, कागदावर तुम्ही शिवसेना वेगळी केली असेल पण त्या कागदालाही वाळवी लागलीय” असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, कोकणची जनता शिवसेनेच्या पाठिशी आहे. स्थानिक भूमिपूत्रांना विषारी जहरी प्रकल्प नको असेल आणि त्यासाठी ते मरायला तयार असतील तर शिवसेना त्यांना मरू देणार नाही. पहिली गोळी शिवसेना छातीवर घेईल. बारसू प्रकल्पाबाबत शिवसेनेने अजिबात दुटप्पीपणाची भूमिका नाही. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ही आमची भूमिका आहे. उद्योग राहिला पाहिजे. रोजगार वाढला पाहिजे. उद्योग जगला तर कामगार जगेल ही आमची भूमिका कायम आहे. मग एअर बस, फॉक्सकॉन वेदांत हे बाहेर का गेले? त्यावर उद्योगमंत्र्यांनी तोंड उघडावे. कोकणातील जनतेला संपवण्याची सुपारी तुमच्याकडेच आहे. निसर्गाला कोकणाचं वरदान मिळाले तिथे विषारी प्रकल्प आणतायेत. बारसू प्रकल्पाजवळ अनेक धनिकांनी जमीन घेतले असा आरोप त्यांनी केला.
२०२४ च्या निवडणुकीविषयी फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याचाही संजय राऊतांनी समाचार घेतला. याविषयी ते म्हणाले,”देवेंद्र फडणवीस खोटे बोलतात. त्यांच्या अंतरंगात काय ते आम्हाला माहिती, इतका अपमान सहन करून ते उपमुख्यमंत्री झाले आहेत. बोलतात एक पण त्यांच्या अंतरंगात जी वेदना आहे ती जवळच्या लोकांना माहिती आहे. आम्ही त्यांच्या जवळचे आहोत. त्यांचे अंतरंग धगधगतंय” असे राऊतांनी सांगितले.





