Smriti Mandhana : स्मृतीच्या वडिलांची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांनी दिली माहिती; म्हणाले, ‘सतत ईसीजी मॉनिटरिंग…’

Smriti Mandhana Father Health Latest Updates : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा आज होणारा विवाहसोहळा अचानक स्थगित करण्यात आला आहे. ऐन लग्नाच्या दिवशी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती खालावल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे दिसल्याने तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. आता त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.
मुहूर्ताच्या काही तास आधी घडली घटना –
आज (२३ नोव्हेंबर) दुपारी ३.३० वाजता स्मृती आणि पलाश यांचा विवाहसोहळा पार पडणार होता. मात्र, सकाळी नाश्ता करताना श्रीनिवास मानधना यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. छातीच्या डाव्या बाजूला वेदना होऊ लागल्याने स्मृतीच्या भावाने तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधला आणि रुग्णवाहिकेतून त्यांना सांगलीतील ‘सर्वहित रुग्णालयात’ दाखल करण्यात आले. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबीय तातडीने रुग्णालयात पोहोचले आणि स्मृतीच्या मॅनेजरने लग्न रद्द झाल्याची माहिती दिली.
डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट –
#WATCH | Sangli, Maharashtra: Father of Indian cricketer Smriti Mandhana has been hospitalised.
Dr Naman Shah, Director of Sarvhit Hospital, says, “Srinivas Manandana, Smriti Manandana’s father, experienced symptoms of a heart attack around 11:30 after feeling left-sided chest… pic.twitter.com/hlRnkJwoB4
— ANI (@ANI) November 23, 2025
सर्वहित रुग्णालयाचे डॉ. नमन शाह यांनी स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “दुपारी १ ते १.३० च्या सुमारास त्यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात आणले गेले. प्राथमिक तपासणीत हार्ट अटॅकची लक्षणे दिसून आली आहेत. त्यांच्या ‘कार्डियाक एन्झाइम्स’च्या पातळीत किंचित वाढ झाली आहे आणि रक्तदाब देखील वाढलेला आहे.” या त्रासाचं कारण विचारल्यावर डॉक्टर म्हणाले, “हा त्रास शारीरिक किंवा मानसिक तणावामुळेही होऊ शकतो. विशेषतः लग्नाच्या निमित्ताने एवढी प्रचंड धावपळ आणि तणाव झाला आहे, त्याचाच हा परिणाम असू शकतो.”
हेही वाचा – IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर! कसोटीनंतर वनडेचाही बदलला कर्णधार, ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्त्व





