IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर! कसोटीनंतर वनडेचाही बदलला कर्णधार, ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्त्व

India’s ODI squad Announced : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाचा नियमित कर्णधार शुबमन गिल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्याने संघाची धुरा अनुभवी खेळाडू के.एल. राहुलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला समतोल राखण्यात आला असून, स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचे बऱ्याच कालावधीनंतर संघात पुनरागमन झाले आहे.
शुबमन दुखापतीमुळे बाहेर, केएल राहुलला संधी –
शुबमन गिलला मानेच्या दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. याच दुखापतीमुळे तो दुसऱ्या कसोटीतही खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुल नेतृत्व करेल. राहुलने यापूर्वी १२ वनडे सामन्यांत भारताचे नेतृत्व केले असून, त्यातील ८ सामने भारताने जिंकले आहेत, तर ४ मध्ये पराभव पत्करावा लागला आहे.
बुमराहला विश्रांती, श्रेयस अय्यरही बाहेर –
आगामी टी-२० वर्ल्ड कप लक्षात घेता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तर श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरत असल्याने त्यालाही संधी मिळालेली नाही. त्याच्या जागी तिलक वर्माला संधी मिळू शकते. तसेच, इंडिया-ए साठी चांगली कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला पुन्हा संघात संधी देण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेचे वेळापत्रक:
- पहिला वनडे: ३० नोव्हेंबर (रांची)
- दुसरा वनडे: ३ डिसेंबर (रायपूर)
- तिसरा वनडे: ६ डिसेंबर (विशाखापट्टणम)
हेही वाचा – Sanju Samson : संजू सॅमसनचं मोठं कमबॅक! या स्पर्धेसाठी मिळाली संघाची मोठी जबाबदारी
भारताचा वनडे संघ: केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल.





