Smart Meter : अखंड वीजपुरवठ्याशिवाय स्मार्ट मीटर नको
Smart Meter : संघर्ष समितीचे महावितरणला निवेदन

Khalapur : शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया घाईगडबडीत सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर खोपोली-खालापूर तालुका संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
खोपोली शहराला प्रथम अखंड, दर्जेदार व सुरक्षित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा आणि त्यानंतरच स्मार्ट मीटरबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
संघर्ष समितीने निवेदनात नमूद केले की, गेल्या दोन वर्षांपासून खोपोली शहराला दर्जेदार आणि अखंड वीजपुरवठा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
पावसाळ्यासह इतर काळात वारंवार वीज खंडित होत असल्याने सामान्य नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण तसेच औद्योगिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
खालापूर हा महत्त्वाचा औद्योगिक तालुका असल्याने अशा प्रकारच्या वीज समस्येचा परिणाम उद्योगांवर होऊन आर्थिक प्रगतीलाही फटका बसत असल्याचे संघर्ष समितीने निदर्शनास आणून दिले. शहरामध्ये भूमिगत वीज केबल टाकण्यासह वीजपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत राहण्यासाठी ठोस नियोजन करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी संघर्ष समितीने स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, जोपर्यंत खोपोलीकरांना अखंड व दर्जेदार वीजपुरवठ्याची हमी मिळत नाही, तोपर्यंत शहरात स्मार्ट मीटरची सक्ती करण्यास नागरिकांचा विरोध कायम राहील.
मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून कोणताही निर्णय नागरिकांवर लादला जाऊ नये. महावितरणने सक्तीचा मार्ग अवलंबिल्यास संघर्ष समिती लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने तीव्र लढा उभारेल, असा इशाराही देण्यात आला. खोपोली-खालापूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने महावितरणला निवेदन देण्यात आले.
तसेच निळकंठ सोसायटी, खोपोलीच्या वतीनेही स्मार्ट मीटर संदर्भात स्वतंत्र निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान, पुढील काही दिवसांत वीजपुरवठ्याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर खोपोली-खालापूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघर्ष समितीचे संजय करंजकर यांनी दिला आहे.
Pune District : सर्वपक्षीय इच्छुकांनी पायधूळ झाडली ; राष्ट्रवादीच्या मुलाखतीत जोरदार शक्तीप्रदर्शन




