Satara: पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर सातारा पालिका निष्काळजी मोठ्या गळतीकडे दुर्लक्ष; बोगदा परिसरात चार दिवसांपासून लाखो लिटर पाणी जातेय वाया
Satara बोगदा परिसरातील घाटाकडून वस्तीकडे जाणारी मुख्य जलवाहिनी अतिक्रमण कारवाईदरम्यान फुटल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Satara: एकीकडे सातारा शहरातील नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले जात आहे, तर दुसरीकडे नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहून जात असल्याचे चित्र बोगदा परिसरात पाहायला मिळत आहे. नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान जलवाहिनीचे नुकसान झाल्याने गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु असून, याकडे पाणीपुरवठा विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
बोगदा परिसरातील घाटाकडून वस्तीकडे जाणारी मुख्य जलवाहिनी अतिक्रमण कारवाईदरम्यान फुटल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, याबाबत नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दोन वेळा माहिती दिली. मात्र, अद्याप कोणतीही प्रभावी दुरुस्ती किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेली नाही. परिणामी, दररोज हजारो नव्हे तर लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
यंदाच्या मान्सूनने जिल्ह्याला अद्याप हुलकावणी दिली असून अनेक धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरणांमध्ये केवळ ३० टक्के पाणीसाठा शिल्लक असताना पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा ठरत आहे. अशा परिस्थितीत नगरपालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे होत असलेली ही पाणी नासाडी संतापजनक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
सातारा शहराचे सुदैव म्हणजे कास धरणाची क्षमता वाढल्यामुळे सध्या सुमारे ४४ फूट पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, त्यामुळे प्रशासनाला निष्काळजीपणाचा परवाना मिळत नाही, अशी टीका होत आहे. शहरातील पाणीटंचाईच्या प्रश्नांवर वारंवार बैठका घेणारे आणि धडाकेबाज भूमिका घेणारे पाणीपुरवठा सभापती ॲड. दत्ता बनकर यांच्यापर्यंत ही गंभीर बाब अद्याप कशी पोहोचली नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
राजकीय वर्तुळातही चर्चा
बोगदा परिसरातील पाणीगळतीचा मुद्दा आता राजकीय रंग घेण्याची चिन्हे आहेत. नगरपालिकेच्या कारभारावर टीका सुरू झाली असून, ‘नागरिकांना पाणी बचतीचे धडे आणि प्रशासनाकडून पाण्याची उधळपट्टी’ अशी भूमिका घेतली जात आहे. आगामी काळात या प्रकरणाची चौकशी करुन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार का, याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे. पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या साताऱ्यात लाखो लिटर पाणी वाया जात असताना प्रशासन जागे होणार कधी, हा खरा प्रश्न आहे.





