Smart Meter Issues – बारामती शहरासह तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांत गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा अचानक खंडित होण्याच्या घटना वाढल्या आहेत. नव्याने बसवण्यात आलेल्या अदानी कंपनीच्या स्मार्ट इलेक्ट्रिकल मीटरमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वीज बंद होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ग्राहकांच्या घरांमध्ये दिवसातून दोन ते तीन वेळा अचानक वीज गायब होत आहे. काही वेळा ही वीज खंडित काही मिनिटांची असते तर काही ठिकाणी तासनतास वीजपुरवठा खंडित राहतो. त्यामुळे घरगुती कामे, लघुउद्योग, कृषीपंप तसेच व्यापारी व्यवहारांवर मोठा परिणाम होत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू असून अदानी समूहाला मोठे कंत्राट दिले आहे. स्मार्ट मीटरचे वैशिष्ट्य म्हणजे वीजपुरवठा रिमोट कंट्रोल पद्धतीने चालू- बंद करता येतो. महावितरण. हाच तांत्रिक बदल आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचा आरोप होत आहे. वीज थकबाकी, तांत्रिक बिघाड किंवा अशा इतर कारणांमुळे एका क्लिकवर वीज बंद होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यापूर्वीही अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा स्मार्ट मीटरद्वारे एका क्लिकवर खंडित करण्यात येत होती. वीज बिल थकीत असून वीज बिल न भरल्यामुळे कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता थेट वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास, ऑनलाइनची कामे आणि इतर व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे. काही ठिकाणी रात्रीच्या वेळी वीज जाण्याच्या घटनाही घडल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. स्मार्ट मीटरबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता सोमेश्वरनगर उपकार्यकारी अभियंता यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. कोल्ड स्टोरेज, लघु उद्योगावर परिणाम अचानक वीज खंडित झाल्याने पाणीपुरवठा बंद पडत आहे. कोल्ड स्टोरेजमधील मालाचे नुकसान होत आहे. वर्कशॉप, गिरणी, दळणवळण यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे शेतकरी आणि व्यावसायिकांमध्ये चर्चा आहे.