छोटे छोटे ताणतणाव घेणे आरोग्यासाठी फायदेशीर

प्रतिकारक क्षमता वाढते आणि मेंदूही राहतो तरुण
वॉशिंग्टन : आधुनिक जगातील स्पर्धात्मक वातावरणामुळे ताणतणाव आता कोणालाही नवीन राहिलेले नाहीत. हे ताण-तणाव आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा इशारा अनेक वेळा देता येतो पण आता एका नवीन संशोधनाप्रमाणे आधुनिक काळामध्ये छोटे छोटे ताण-तणाव घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते . त्या ताणतणावांमुळे माणसाची प्रतिकारक्षमता वाढते आणि त्याचा मेंदूही दीर्घकाळ तरुण राहतो.
1990 च्या दशकात झालेल्या संशोधनाप्रमाणे मानसिक ताणतणाव हे आरोग्यासाठी धोकादायक आहेत. हा सिद्धांत मांडण्यात आला होता पण आता या सिद्धांताला छेद देणारी भूमिका आधुनिक मानसशास्त्रज्ञ मांडत आहेत. न्यूयॉर्कमधील रॉकफेलर युनिव्हर्सिटीतील संशोधक फिरदोस डाबर यांनी याबाबतचे संशोधन केले आहे.
आधुनिक जगात असे छोटे छोटे ताण-तणाव महत्त्वाचे आणि उपयुक्त ठरू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे, क्रीडास्पर्धेतील एखादा स्पर्धक स्पर्धेची तयारी करत असेल तर आपण या स्पर्धेत जिंकू किंवा जिंकणार नाही. याबाबतचा ताण तणाव त्याने घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
तरच त्याच्या स्पर्धेतील कामगिरीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा स्वरूपातील शारीरिक आणि मानसिक तणावामुळे शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारची रसायने सक्रिय होतात. जी आरोग्यासाठी सुद्धा महत्त्वाची ठरू शकतात. ताणतणावामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या या रसायनांमुळे मेंदू जास्त ताजातवाना आणि सक्रिय राहतोच शिवाय माणसाची प्रतिकारक्षमता सुद्धा लक्षणीय पद्धतीने वाढते असे या संशोधकांचे म्हणणे आहे.





