झोपडपट्टी पुनर्वसनला मिळणार गती- मुख्यमंत्री

मुंबई : मुंबईतील झोपडपट्ट्यांचा रखडलेल्या पुनर्विकासामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अनेक प्रकल्पांचे बांधकाम बंद असल्याने रहिवाशांना वेळेवर भाडेही मिळत नसल्याने हजारो कुटुंबियांना बाजारभावाप्रमाणे घरभाडे देऊन भाड्याच्या घरात किंवा संक्रमण शिबिरात खितपत पडून राहावे लागत आहे.
मात्र, अशा कुटुंबियांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलासा दिला आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाच्या रखडलेल्या योजनांना गती द्यावी, तसेच अशा पुनर्वसनाच्या योजनांच्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्रीकृत यंत्रणा निर्माण करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मंत्रालयात गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टी पुनर्वसनाच्या रखडलेल्या योजनांची माहिती घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी अशा रखडलेल्या योजनांना गती देण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत देण्यात येणाऱ्या सदनिकांची संख्या वाढली पाहिजे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत पात्र झोपडपट्टीधारकांचे परिशिष्ट-2 तयार करण्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्रीकृत यंत्रणा निर्माण करावी व त्यासाठी निश्चित कालमर्यादा आखून द्यावी.
तसेच म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाच्या अनुषंगाने विकास नियंत्रण नियमावली 33 (9) खाली म्हाडाने येत्या 15 दिवसात किमान दोन प्रस्ताव सादर करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, गृहनिर्माण उद्योगाला उभारी देण्याची गरज आहे. पुनर्विकासाचा सर्वात मोठा स्त्रोत म्हाडा आहे. झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करताना मूळ मालकालाच घरे मिळाली पाहिजेत. म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत लोकसंख्येनुसार प्रसाधनगृहांची संख्याही वाढवावी असे निर्देश आव्हाड यांनी दिले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घराचा पुनर्विकास
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील ज्या घरात वास्तव्य होते त्या संपूर्ण इमारतीचा विकास म्हाडाने करावा असे आव्हाड यांनी सांगितले. राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी गृहनिर्माण योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याची गरज यावेळी व्यक्त केली.
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी रखडलेल्या योजनांना गती देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. गोरेगाव सिद्धार्थनगर पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात म्हाडाने उर्वरित काम तत्काळ पूर्ण करावे व रहिवाशांचे थकलेले भाडे द्यावे अशा सूचना त्यांनी केल्या.





