Assam Opinion Poll 2026: आसाममध्ये कोणाचं सरकार येणार? ओपिनियन पोलमध्ये समोर आली ‘ही’ माहिती
Assam Opinion Poll 2026: आसाममधील १२६ जागांसाठी ९ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून, ४ मे २०२६ रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या ओपिनियन पोलमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विरोधकांना आपली रणनीती बदलण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

Assam Opinion Poll 2026: आसाम विधानसभा निवडणूक २०२६ चे रणशिंग फुंकले गेले असून, समोर आलेल्या पहिल्या ओपिनियन पोलने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. ‘CNN-News18’ आणि ‘Vote Tracker’ च्या सर्व्हेनुसार, आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. १२६ जागांच्या विधानसभेत भाजप आघाडीला ८० ते ९० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विपक्ष ‘इंडिया’ आघाडीचे आव्हान तोकडे?
ओपिनियन पोलनुसार, विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीला केवळ २९ ते ३९ जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. इतर प्रादेशिक आणि छोटे पक्ष या निवडणुकीत पूर्णपणे बाहेर फेकले जातील, असे चित्र आहे. भाजपची पकड विशेषतः अप्पर आसाम, लोअर आसाम आणि उत्तर किनारपट्टीच्या भागात अत्यंत मजबूत दिसून येत आहे.
मुख्यमंत्री पदासाठी ‘सरमा’ पहिली पसंती –
राज्यात ‘अँटी-इन्कम्बन्सी’ (सत्ताविरोधी लाट) नसल्याचे या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री पदासाठी ४८% जनतेने हिमंता बिस्वा सरमा यांना पहिली पसंती दिली आहे, तर काँग्रेस नेते गौरव गोगोई ३७.७% समर्थनासह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सुमारे ४७% मतदार सरकारच्या कामगिरीवर समाधानी असून, बांगलादेशी घुसखोरांविरुद्धच्या कारवाईला ५०.६% लोकांनी ‘चांगले’ किंवा ‘खूप चांगले’ म्हटले आहे.
मतांची टक्केवारी –
NDA वोट शेअर: ४२.७%
विरोधी पक्ष वोट शेअर: ३६.१%
दरम्यान, महिलांसाठीची ₹९,००० ची थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना गेमचेंजर ठरू शकते. ४२.८% लोकांचा या योजनेला पाठिंबा आहे. मात्र दुसरीकडे बेरोजगारी (२५.७%) हा मतदारांसाठी सर्वात मोठा मुद्दा आहे. त्याखालोखाल पूर, पुनर्वसन आणि भ्रष्टाचार या विषयांवरून तरुण मतदार (१८-२४ वयोगट) काहीसा नाराज असल्याचे दिसते.
निवडणुकीचे वेळापत्रक:
आसाममधील १२६ जागांसाठी ९ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून, ४ मे २०२६ रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या ओपिनियन पोलमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विरोधकांना आपली रणनीती बदलण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.





