SL vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा, ‘या’ स्टार खेळाडूचे वर्षभरानंतर पुनरागमन…

SL vs NZ Test Series : श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ही मालिका 18 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघानेही आपला संघ जाहीर केला आहे. या संघात एकूण 16 खेळाडूंना संधी दिली आहे. श्रीलंकेचा संघ गेल्या काही काळापासून चांगले क्रिकेट खेळत आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेदरम्यान चाहत्यांना रोमांचक सामन्यांची अपेक्षा आहे. श्रीलंकेचा संघ धनंजय डी सिल्वाच्या नेतृत्वाखाली ही मालिका खेळणार आहे.
16 सदस्यीय संघात मोठी चुरस आहे. सर्वप्रथम, यात 18 महिने संघाबाहेर असलेला फलंदाज ओशादा फर्नांडोचे पुनरागमन झाले आहे. तो संघात निशान मधुशंकाची जागा घेणार आहे. श्रीलंकेसाठी 21 कसोटी खेळणारा ओशादा फर्नांडोने 33.06 च्या सरासरीने 1 हजार 091 धावा केल्या आहेत, ज्यात 1 शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याशिवाय इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या संघातील 3 खेळाडूंना वगळण्यात आले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेसाठी निवड न झालेल्या इंग्लंड दौऱ्याच्या संघातील तीन खेळाडूंमध्ये निशान मधुशंका, निसाला थरका आणि कसून राजिता यांचा समावेश आहे.
गेल्या दोन मालिकांमध्ये श्रीलंकेचा संघ अप्रतिम कामगिरी करत आहे. त्यांनी अलीकडेच एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचा पराभव केला होता. इंग्लंड दौऱ्यावर त्यांच्या संघाला 2-1 असा पराभव पत्करावा लागला असला तरी या सर्व सामन्यांमध्ये श्रीलंकेने चुरशीची लढत दिली आहे. श्रीलंकेने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटचा सामना एकतर्फी जिंकला होता. अशा स्थितीत किवी संघ त्याला हलके घेण्याची चूक करणार नाही. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जाणारी ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर श्रीलंकेचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.
🚨 Sri Lanka have announced their squad for the #SLvNZ Tests
Oshada Fernando has been named after more than a year since his last appearance in red-ball cricket 🔁 pic.twitter.com/Tj5Q5byBKc
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 16, 2024
कसोटी मालिकेचे वेळापत्रक….
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका 18 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. जिथे पहिला कसोटी सामना गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर तर मालिकेतील दुसरा सामना 26 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. हा सामनाही गाले इंटरनॅशनल स्टेडियमवरच होणार आहे. न्यूझीलंडने फार पूर्वीच आपला संघ जाहीर केला होता. नोएडाहून त्यांची टीम श्रीलंकेत पोहोचली आहे. या मालिकेपूर्वी ते अफगाणिस्तानविरुद्ध नोएडा येथे एकमेव कसोटी सामना खेळणार होते, परंतु सलग पाच दिवस पावसामुळे संपूर्ण सामना रद्द करावा लागला होता.
कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ….
धनंजय डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कामिंदु मेंडिस, सदीरा समरविक्रमा, ओशादा फर्नांडो, कुसल मेंडिस, एंजेलो मैथ्यूज, असिथा फर्नांडो, दिनेश चांडीमल, विश्व फर्नांडो, लाहिरू कुमारा, प्रभात जयसूर्या, रमेश मेंडिस, जेफरी वेंडरसे, मिलन रथ्नायके.





