Mohammad Nabi : मोहम्मद नबीने रचला इतिहास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच खेळाडू!

Mohammad Nabi 6000 Runs Complete : आशिया कप 2025 दरम्यान अफगाणिस्तानचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6000 हून अधिक धावा करणारा तो अफगाणिस्तानचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात नबीला हा टप्पा गाठण्यासाठी फक्त 3 धावांची गरज होती, आणि त्याने ही कामगिरी सहजपणे पूर्ण केली.
मोहम्मद नबीने साकारली 60 धावांची खणखणीत खेळी –
40 वर्षीय नबीने अबुधाबी येथे झालेल्या अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील आशिया चषक 2025 च्या सामन्यात 15व्या षटकातील पहिल्या चेंडूवर श्रीलंकेचा माजी कर्णधार दासुन शनाकाच्या गोलंदाजीवर एक धाव घेत हा ऐतिहासिक टप्पा गाठला. मोहम्मद नबीने श्रीलंकेविरुद्ध 22 चेंडूंमध्ये 60 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले. विशेष म्हणजे, शेवटच्या षटकात श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वेल्लालगे याच्या पाच चेंडूंवर नबीने पाच षटकार ठोकले. नबीच्या या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने 20 षटकांत 169 धावांचा डोंगर उभा केला.
🚨 5 SIXES IN A SINGLE OVER BY A 40 YEAR OLD MOHAMMAD NABI. 🚨 pic.twitter.com/gdeSwKfSlO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 18, 2025
आफगाणिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –
- मोहम्मद नबी – 315 सामने – 6000 धावा – सर्वोच्च 136
- रहमत शाह – 135 सामने – 4948 धावा – सर्वोच्च 234
- मोहम्मद शहजाद – 159 सामने – 4844 धावा – सर्वोच्च 131
- असगर अफगाण – 195 सामने – 4246 धावा – सर्वोच्च 164
- नजीबुल्लाह झद्रान – 199 सामने – 3890 धावा – सर्वोच्च 104
हेही वाचा – IND A vs AUS A : ध्रुव जुरेलचा कांगारुंना शतकी तडाखा; वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी ठोकला दावा
मोहम्मद नबीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नबीने आतापर्यंत 315 सामने खेळले असून 6000 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 कसोटी सामन्यांत 33 धावा, 173 एकदिवसीय सामन्यांत 3667 धावा आणि 139 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 2300 धावा यांचा समावेश आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावांचा खेळाडू आहे. आशिया चषकाच्या टी-20 स्वरूपात त्याने दोन हंगामांत 11 सामने खेळले असून, 160 धावा आणि 7 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह आपल्या बॉलिंग रनअपवर ‘जेएसए’ का लिहितो? जाणून घ्या कारण
अफगाणिस्तानसाठी विजय आवश्यक –
अबुधाबी येथे श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा सामना अफगाण संघासाठी ‘करो वा मरो’ असा आहे. राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल, जेणेकरून ते गट ‘ब’ मधील पहिल्या दोन संघांमध्ये स्थान मिळवून सुपर 4 मध्ये प्रवेश करू शकतील. जर अफगाणिस्तान हा सामना जिंकला, तर ते गुणतक्त्यात श्रीलंकेला मागे टाकून सुपर 4 मध्ये स्थान मिळवेल. परंतु, जर ते हरले, तर श्रीलंका गट ‘ब’ मध्ये अव्वल स्थानावर राहील आणि बांगलादेशसह सुपर 4 साठी पात्र ठरेल.





