युतीत संशयकल्लोळ

शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत
मुंबई: लोकसभा निवडणुकीपूर्वी कबूल केल्याप्रमाणे विधानसभेच्या अर्ध्या जागा सोडण्यास नकार देणाऱ्या भाजपाने चर्चाही थांबवल्याने युती होणार की नाही याबाबत शिवसेनेत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, वेळ आल्यास स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याने युतीत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

गेले दोन महिने “आमचं ठरलंय’ असं सांगणाऱ्या शिवसेना-भाजपाच्या जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. लोकसभा निवडणुकीसाठी युती करताना मित्रपक्षांच्या जागा सोडून उरलेल्या जागा समसमान वाटून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याची घोषणाही भाजप अध्यक्ष अमित शहा व उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीचे कारण सांगून भाजपने अर्ध्या जागा सोडण्यास नकार दिला असून शिवसेनेला 110 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. शिवसेनेने आधी ठरल्याप्रमाणेच जागावाटप व्हावे असा आग्रह धरल्याने युतीतील चर्चा जवळपास बंदच झाली आहे.

चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे दोन्हीकडून सांगितले जात असले तरी गेल्या आठवड्यात कोणताही संवाद झालेला नसल्याचे समजते. यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच उद्विग्न होऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनीच आमच्या जागा व उमेदवार ठरवून यादी पाठवून द्यावी, असे विधान केले होते.

या पार्श्‍वभूमीवर रविवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या मंत्री, आमदार व वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन ऐनवेळी युती झाली नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी अशी सूचना केली आहे. शिवसेनेच्या एका वरिष्ठ मंत्र्याने मात्र युती होईल असा विश्वास व्यक्त करताना प्रत्येक पक्षाला सर्व बाबींची तयारी ठेवावीच लागते असे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप शनिवारी पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यांनतर पुढच्या आठवड्यात युतीबाबत निर्णय होईल असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)