Ketan Aggarwal Case : सिया-चेतनचा ‘कोडवर्ड’ गेम उघड! मोबाईलमधील डिलिट डेटा ठरणार महत्त्वाचा पुरावा?
Ketan Aggarwal Case : युक्तिवादात तपासाच्या दृष्टीने त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळत त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Ketan Aggarwal Case : केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या मोबाईलमधून डिलिट केलेला डेटा तांत्रिक पद्धतीने रिकव्हर करण्यात आला असून, त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तपासादरम्यान दोघेही पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि कथित कट लपवण्यासाठी मोबाईलवर सांकेतिक भाषा (कोड लँग्वेज) तसेच टोपणनावांचा (निकनेम) वापर करत असल्याचे उघड झाले आहे. काल सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी संपली.
त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. युक्तिवादात तपासाच्या दृष्टीने त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळत त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
न्यायालयात काय घडलं?
सरकारी वकील राजश्री वीरकुड आणि तपास अधिकारी मनोज पवार यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपींनी वापरलेल्या सांकेतिक शब्दांचा नेमका अर्थ काय, त्यांचा केतन अग्रवाल यांच्या हत्येच्या कथित कटाशी काय संबंध आहे, याचा उलगडा करण्यासाठी दोन्ही आरोपींची समोरासमोर चौकशी आवश्यक आहे. यासाठी पोलिसांनी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.
मात्र, बचाव पक्षाचे वकील विपुल दुशिंग यांनी तांत्रिक तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत वडगाव मावळ न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी ए. एम. विभुते यांनी आरोपींची पोलीस कोठडी फेटाळून लावत त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
नार्कोटेस्टची मागणीही फेटाळली
दरम्यान, सांकेतिक भाषेचा अर्थ उलगडण्यासाठी आरोपींची नार्को चाचणी करण्याचा मुद्दाही न्यायालयात उपस्थित झाला. मात्र, आरोपींच्या संमतीशिवाय नार्को चाचणी करता येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
आणखी खुलासे होणार असल्याची शक्यता
१८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवालची हत्या झाली. या प्रकरणी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यावर केतनच्या हत्येचा आरोप आहे. पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या तीन मोबाईलमधील डिलिट डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. या डेटाच्या आधारे तपासात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बीडच्या तरुणाकडून धक्कादायक माहिती
या प्रकरणात आता तिसऱ्या व्यक्तीची एंन्ट्री झाली आहे. पोलिसांनी पुण्यात राहणाऱ्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, चौकशीत संबंधित तरूणाला केतन अग्रवालची हत्या करण्याचा कट आखला जात असल्याची पूर्वकल्पना होती. तरुणाने दोघांना यापासून रोखले होते. मात्र, सिया आणि चेतन यांनी केतनची लोहगड किल्ल्यावर नेऊन उंच कड्यावरून ढकलून हत्या केली. या तरुणाकडून माहिती घेतली जात असून आणखी धक्कादायक माहिती समोर येणार असल्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Nira Valley Dams: नीरा खोऱ्यात पावसाची जोरदार हजेरी! भाटघर, नीरा देवघरसह ४ धरणांतील पाणीसाठ्यात वाढ सुरू






