Ketan Aggarwal case : कॅफे, टेकडी आणि लोहगड; पोलिसांनी तपासात केले 12 थरारक खुलासे, आता पुढे काय होणार?
Ketan Aggarwal case : या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेले महत्त्वाचे धागेदोरे आणि पुरावे आज न्यायालयासमोर सादर केले जाण्याची शक्यता आहे.

Ketan Aggarwal case : लोहगडावर १८ जून रोजी घडलेल्या केतन अगरवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे दोघांनाही आज दुपारी अडीच वाजल्यानंतर वडगाव-मावळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश ए. एम. विभूते यांच्या न्यायालयात होणार आहे.
दरम्यान, सिया गोयलची बाजू आता अॅड. विपुल दूशिंग मांडणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले असून, त्यामुळे अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी या प्रकरणातून माघार घेतल्याची चर्चा आहे. तर चेतन चौधरीच्या वतीने अॅड. राधिकेश उत्तरवार आणि अॅड. राम शहाणे न्यायालयात बाजू मांडतील. सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील राजश्री विरकुड मांडणार आहेत.
गेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत दोन्ही आरोपींची कसून चौकशी करण्यात आली. या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेले महत्त्वाचे धागेदोरे आणि पुरावे आज न्यायालयासमोर सादर केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केतन अग्रवाल प्रकरणात आरोपींना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी या दिवशी न्यायालयात आरोपी सिया गोयल आणि चेतन अग्रवाल यांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली होती. तपासादरम्यान या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे पोलिसांसमोर आले आहेत. अजूनही माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा : Nitin Navin : नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा लवकरच? राजधानी दिल्लीत हालचालींना वेग
केतन अगरवाल प्रकरणात पोलिसांनी उलगडले कटाचे धागेदोरे
लोहगडावरील केतन अगरवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी गेल्या काही दिवसांत तपासाला वेग देत अनेक महत्त्वाच्या बाबींची पडताळणी केली आहे.
- तपासादरम्यान सिया गोयलला पुण्यातील लुल्लानगर येथील त्या कॅफेत नेण्यात आले, जिथे हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यानंतर लुल्लानगरमधील टेकडीवर नेऊन हत्येचा सराव नेमका कसा करण्यात आला, याची घटनास्थळी पाहणी आणि पुनर्रचना करण्यात आली.
- फॉरेन्सिक प्रयोगशाळेत सिया, चेतन चौधरी आणि कामगार नीरज कुमार यांच्या मोबाईलमधील डिलीट झालेला डेटा रिकव्हर करण्यात आला असून, डिजिटल पुराव्यांचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले आहे.
- गुन्ह्यानंतर सिया आणि चेतन यांनी कोणाची भेट घेतली होती का, कोणाशी संवाद साधला होता का किंवा हत्येबाबत कोणाला काही माहिती दिली होती का, याचाही तपास पोलिसांनी केला आहे.
- सियानंतर चेतन चौधरीसोबतही घटनास्थळाची पुनर्रचना (क्राईम सीन रिक्रिएशन) करण्यात आला. तसेच चेतनच्या ‘गेट अॅनालिसिस’मधून महत्त्वाचे आणि सबळ पुरावे हाती लागल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
- हत्येच्या दिवशी लोहगडावर दोघांनी कोणाशी संवाद साधला होता का, तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या त्यांच्या हालचाली आणि परस्परांतील संभाषणाचा तपशीलही तपासण्यात आला.
- याशिवाय ३१ मे, ४ जून आणि १४ जून या दिवशीही हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता का, याची घटनास्थळी जाऊन सखोल चौकशी करण्यात आली आहे.
- खालापूर टोल नाक्यावरील फूड मॉलमध्ये जाऊन केतन अगरवाल यांचा पासपोर्ट शोधण्याचाही पोलिसांनी प्रयत्न केला.
- तपासादरम्यान काही नवे साक्षीदार समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला असून, त्यांची आरोपींसोबत समोरासमोर चौकशीही करण्यात आली आहे.
- सिया आणि चेतन यांनी हत्येपूर्वी लोहगड किल्ल्याची किती वेळा रेकी केली, या कटासाठी ते किती वेळा भेटले आणि या संपूर्ण कटात आणखी कोणी सहभागी होते का, या सर्व बाबींवर दोघांची कसून चौकशी करण्यात आली आहे.
आज ३ जुलै सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपत असून वडगाव मावळ न्यायालयात पोलिस पुरावे सादर करणार असल्याची माहिती मिळत असून न्यायालय या प्रकरणात काय निर्णय घेणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Vasant More: ‘मलाही शिंदे सेनेकडून ऑफर आली होती’; वसंत मोरे यांचा मोठा गौप्यस्फोट






