Jejuri : पंधरा दिवसांत सहा जणांनी मृत्यूला कवटाळले
Jejuri : पूर्व पुरंदरमध्ये पंधरा दिवसांच्या कालावधीत आत्महत्येच्या सहा घटना घडल्याने जेजुरी परिसर हादरून गेला आहे. यामध्ये तरुणांचाही समावेश असल्याने चिंता अधिक वाढली आहे.

जेजुरी : जेजुरी पोलिस ठाणे हद्दीतील विविध गावांत गेल्या पंधरा दिवसांत सहा नागरिकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूर्व पुरंदरमधील वेगवेगळ्या गावांत घडलेल्या या आत्महत्येच्या सत्रामुळे नागरिक व नातेवाईकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, या वाढत्या घटनांमुळे सर्वत्र तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
जेजुरी पोलिस ठाण्यात झालेल्या घटनांची नोंद
१) ४ ऑक्टोबर २०२६: विशाल विजय सणस (वय ३०, रा. मांडकी, ता. पुरंदर) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत विराज विजय सणस यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली असून, हवालदार भोंगळे तपास करत आहेत.
२) ८ ऑक्टोबर २०२६: मयुर बालाजी देवकांबळे (वय १९, रा. भांडगाव, ता. दौंड) यांनी माळशिरस गावच्या हद्दीत, भुलेश्वर मंदिरामागे वनविभागाच्या जमिनीतील झाडाला गळफास लावून घेतला. मारुती ज्ञानोबा माने यांनी खबर दिली असून, हवालदार मुजावर तपास करत आहेत.
३) ८ ऑक्टोबर २०२६: योगिता बिपीन जगताप (वय ३८, रा. बेलसर, ता. पुरंदर) या विवाहितेने राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. त्यांचा शिवणकामाचा व्यवसाय होता. अनिल ज्ञानदेव जगताप यांनी खबर दिली असून, हवालदार पखाले तपास करत आहेत.
४) १७ ऑक्टोबर २०२६: महेश विजय कदम (वय २८, रा. मावडी क. प., ता. पुरंदर) यांनी जवळार्जुन गावच्या हद्दीतील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. विजय सोपान कदम यांनी खबर दिली असून, हवालदार राऊत तपास करत आहेत.
५) १८ ऑक्टोबर २०२६: अभिषेक विजय काटे (वय २७, रा. साकुर्डे, ता. पुरंदर) यांनी स्वतःच्या घरातील जिन्यामध्ये पाईपला गळफास घेतला. सुभाष उत्तम काटे यांनी खबर दिली असून, हवालदार पखाले तपास करत आहेत.
६) २१ ऑक्टोबर २०२६: अनिल उत्तम घोगरे (वय ४९, रा. दौंडज, ता. पुरंदर) यांनी जेजुरी येथील देवमळा पालखी मार्गावर स्वतःच्या वाहनामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. किरण आत्माराम घोगरे यांनी खबर दिली असून, हवालदार जाधव पुढील तपास करत आहेत.
प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
पूर्व पुरंदरमध्ये पंधरा दिवसांच्या कालावधीत आत्महत्येच्या सहा घटना घडल्याने जेजुरी परिसर हादरून गेला आहे. यामध्ये तरुणांचाही समावेश असल्याने चिंता अधिक वाढली आहे. पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व प्रकरणांचा तपास सुरू असला, तरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेने या वाढत्या दुर्दैवी घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन समुपदेशन व जनजागृतीचे उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.





