Manchar : कळंबच्या किसान कनेक्ट सेंटरचा कारभार वादात
Manchar : कंपनीचे संचालक विवेक निर्मळ यांनी १० सप्टेंबर रोजी झालेल्या चर्चेनंतर ३१ ऑक्टोबरपर्यंत चार टप्प्यांत थकीत रक्कम देण्याचे लेखी आश्वासन दिले होते.

मंचर : आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील किसान कनेक्ट कलेक्शन सेंटरने शेतकऱ्यांचे जून ते सप्टेंबर या कालावधीतील १० कोटी रुपयांहून अधिक पेमेंट थकविल्याचा आरोप करण्यात आला आहे.तसेच १०० हून अधिक कामगारांचे तीन महिन्यांचे वेतनही रखडले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव तालुका कार्याध्यक्ष अजय आवटे यांनी शेतकरी व कामगारांसह तीव्र आंदोलनाचा इशारा देवून मंचर पोलीस ठाण्याला संबंधितांच्या तक्रार अर्ज देण्यात आला.
कंपनीचे संचालक विवेक निर्मळ यांनी १० सप्टेंबर रोजी झालेल्या चर्चेनंतर ३१ ऑक्टोबरपर्यंत चार टप्प्यांत थकीत रक्कम देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र,अद्याप एकही हप्ता मिळाला नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. दिवाळी तोंडावर असताना शेतकरी आणि कामगार आर्थिक संकटात सापडले आहेत.अजय आवटे व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष वैभव उंडे यांनी दूरध्वनीद्वारे कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून थकीत देणी तातडीने देण्याची मागणी केली.
कामगारांच्या वेतनाचा प्रश्न आणि अन्यायाबाबत २१ ऑक्टोबर रोजी मंचर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. यावेळी लांडेवाडीचे माजी सरपंच अंकुश लांडे, रोहन राजगुरू,वैभव भालेराव यांच्यासह संकेत गुरव,गणेश बगाड, मयूर शिंदे आणि अन्य कामगार उपस्थित होते.शेतकरी व कामगारांना ३१ ऑक्टोबरपर्यंत न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा आवटे यांनी दिला.





