Israeli strike on Gaza hospital : रुग्णालयावर इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सहा ठार; शस्त्रक्रिया विभागाचे नुकसान, डझनभर जखमी
इस्रायली लष्कराने हल्ल्याची पुष्टी करताना हमासच्या एका वरिष्ठ दहशतवाद्याला आणि अन्य अतिरेक्यांना लक्ष्य केल्याचा दावा केला.

Israeli strike on Gaza hospital : दक्षिण गाझामधील खान युनिस शहरातील नासेर रुग्णालयावर इस्रायलने गुरुवारी पहाटे केलेल्या हवाई हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर किमान डझनभर जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका डॉक्टरांचाही समावेश असल्याची माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली.
मंत्रालयाच्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाला या हल्ल्याचा फटका बसला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या असोसिएटेड प्रेसच्या पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा काही भाग उद्ध्वस्त झाला आहे.
इस्रायली लष्कराने हल्ल्याची पुष्टी करताना हमासच्या एका वरिष्ठ दहशतवाद्याला आणि अन्य अतिरेक्यांना लक्ष्य केल्याचा दावा केला. मात्र, या दाव्याच्या समर्थनार्थ कोणताही पुरावा सादर करण्यात आलेला नाही.
खान युनिसमधील नासेर रुग्णालय हे गाझामधील सध्या कार्यरत असलेल्या मोजक्या वैद्यकीय केंद्रांपैकी एक आहे. युद्धामुळे या भागातील आरोग्य व्यवस्था गंभीर संकटात सापडली आहे.
दरम्यान, हमास आणि त्यांचे सहकारी रुग्णालयांचा लष्करी कारवायांसाठी आडोसा म्हणून वापर करत असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. यापूर्वीही नासेर रुग्णालयाच्या परिसरात झालेल्या इस्रायली हल्ल्यात पाच पत्रकारांचा मृत्यू झाला होता. त्यात एपीसाठी काम करणाऱ्या मरियम दग्गा यांचाही समावेश होता.






