धक्कादायक..! कोल्हापुरात सहा नृत्यांगणांचा आत्महत्येचा प्रयत्न, नेमकं कारण काय?

कोल्हापूर : कोल्हापुरातील महिला सुधारगृहात असलेल्या सहा नृत्यांगणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. एकत्रितपणे या सहा सुद्धा महिलांनी हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. ही माहिती समोर येताच या सर्व महिलांना तातडीने सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पण या महिलांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला? यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सहाही महिलांना दोन महिन्यांपूर्वी एका गुन्ह्यामध्ये कारवाई करत पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या सध्या न्यायालयीन कैदेत आहेत. रिसॉर्टवर अश्लील नृत्य केल्याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले होते. वारंवार कारवाई केल्यानंतर न्यायालयाकडून या सहाही महिलांना महिला सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले होते.
त्यामुळे या सहा नृत्यांगणा गेल्या दोन महिन्यांपासून महिला सुधारगृहात होत्या. ज्यामुळे या सुधारगृहातून जामीन मिळावा, यासाठी महिलांकडून वारंवार अर्ज करण्यात येत होता. पण त्यांचा जामीन अर्ज नेहमीच फेटाळण्यात येत होता आणि याच कारणामुळे या महिला नैराश्यात गेल्या होत्या. ज्यानंतर त्यांनी शुक्रवारी आपल्या हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण या घटनेची माहिती मिळताच त्यांना तत्काळ सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या महिलांनी नेमके इतके मोठे पाऊल का उचलले? याचे कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेनंतर काही वेळातच वाऱ्याच्या वेगाने ही बातमी संपूर्ण सुधारगृहात पसरली आणि यामुळे खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरू केला असून लवकरच याचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले आहे.




