“संभाजी भिडेंवर हल्ला करणाऱ्या ‘त्या’ कुत्र्याची एसआयटी चौकशी करा”; कोणी केली उपरोधक टीका

मुंबई – शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली होती. या घटनेवरून विजय वडेट्टीवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधक टीका केली आहे.
कुणाला चावावे हे कुत्र्याला कळले नाही याचे वाईट वाटते. संभाजी भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. तर महत्त्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काही उचलले जात नाहीत, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना दोन इंजेक्शन दिले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी संभाजी भिडेंना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
महापालिकेला जाग आली :
सांगली शहरातल्या माळी गल्ली या ठिकाणी रात्रीच्या सुमारास संभाजी भिडे यांना एका कुत्र्याने चावा घेतल्याचा प्रकार घडला होता त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून आता शहरातल्या भटके कुत्र्यांना पकडण्यात येत आहे. सांगली महानगर पालिकेच्या डॉग व्हॅन पथकाकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.





