“साहेब ज्यांना अशा पद्धतीने भेटले ते पुन्हा सत्तेत आले नाहीत”; काँग्रेसची खोचक प्रतिक्रिया

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार आखणी करत असल्याचे दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून योगी आदित्यनाथ सरकारकडून विविध विकासकामांचा दावा केला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. आता याच फोटोवरुन चंदीगढमधील काँग्रसचे नेते अशोक बासोया यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
योगी आदित्यनाथ यांनी शेअर केलेल्या दोन फोटोंमध्ये पंतप्रधान मोदी योगींच्या पाठीवर हात ठेऊन चालल्याचे दिसत आहेत. योगींच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या फोटोंपैकी एक फोटो समोरुन तर एक फोटो पाठमोरा आहे. या फोटोंवरुन सोशल नेटवर्किंगवर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले.
भाजपा समर्थकांकडून या फोटोच्या माध्यमातून मोदींचा योगींवरील विश्वास दिसून येत असल्याचा दावा केला जात आहे. तर काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या समर्थकांनी मोदींवर टीका केली आहे. असाच एक टोला अशोक बासोया यांनी मोदी आणि योगींचा हा व्हायरल फोटो कोलाजमध्ये शेअर करत लगावला आहे.
जिसे साहेब ऐसे मिले वो वापस सत्ता में नहीं आ पाया ! pic.twitter.com/84TCIzfb0p
— Ashok Basoya (@ashokbasoya) November 21, 2021
पंतप्रधान मोदीजी आतापर्यंत ज्या ज्या नेत्यांना भेटलेत ते पुन्हा सत्तेत आले नाहीत अशी अर्थाच्या कॅप्शनसहीत अशोक यांनी पंतप्रधानांचे चार नेत्यांसोबतचे फोटो शेअर केलेत. यामध्ये मोदी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इस्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष बेन्यामिन नेतान्याहू, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा फोटो आहे. तर शेवटच्या फोटमध्ये योगी आणि मोदी एकत्र चालताना दिसत आहेत. “ज्यांना (मोदी) साहेब अशापद्धतीने भेटले तो (नेता) पुन्हा सत्तेत आला नाही,” असे अशोक यांनी हा फोटो शेअर करत म्हटले आहे.
या फोटोच्या माध्यमातून आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये सध्या सत्तेत असणाऱ्या योगी आदित्यनाथ यांचा म्हणजेच भाजपाचा पराभव होणार असल्याचे संकेत या काँग्रेसच्या नेत्याने देण्याचा प्रयत्न केला आहे.




