Rahul Gandhi : “एसआयआर म्हणजे मतचोरीसाठीचा मार्ग” – राहुल गांधी
कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉंग्रेसने सोमवारी देशभरात निदर्शने केली. तर, स्वत: राहुल यांनी दिल्लीतील एका झोपडपट्टीला भेट दिली.

Rahul Gandhi – मतदारयाद्या पडताळणी (एसआयआर) म्हणजे मतचोरीसाठीचा मार्ग आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार पदावरून जातील. पण, त्यांच्याकडून सर्व काही करवून घेणाऱ्या व्यवस्थेलाही उत्तर द्यावे लागेल, असा इशारा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला.
कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉंग्रेसने सोमवारी देशभरात निदर्शने केली. तर, स्वत: राहुल यांनी दिल्लीतील एका झोपडपट्टीला भेट दिली. तिथे राहणाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरून भाष्य केले. मी भेट दिलेल्या वस्तीत ७२८ मतदार राहतात.
त्यांच्यापैकी केवळ एकाचेच नाव एसआयआरनंतर मतदारयादीत राहिले. उर्वरित ७२७ जणांची नावे वगळण्यात आली. ते लोक अनेक वर्षांपासून त्याच वस्तीत राहतात. त्यांनी २०२४ यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत आणि मागील वर्षीच्या (२०२५) दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदान केले.
त्यांची घरे वर्ष २०२३ मध्ये पाडण्यात आली. मात्र, इतर कुठे न जाता ते आताच्या वस्तीमध्येच राहिले. त्यांची भेट घेऊन निवडणूक आयोगाने त्यांच्याशी काय केले ते मी त्यांच्याकडूनच ऐकून घेतले, असे राहुल यांनी म्हटले.
घर असण्याचा किंवा नसण्याचा मताधिकाराशी कुठला संबंध नाही. स्वत: कुमार यांनी याआधी घर क्रमांक शून्य बेघरांसाठी असल्याचे म्हटले. तसे असूनही ७२७ मतदारांची नावे यादीतून हटवण्यात आली. ज्यांच्याकडे आधीच खूप कमी आहे;
त्यांच्याकडून एकमेव ताकदही (मताधिकार) हिरावली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. एसआयआर, निवडणूक आयोगाचे कामकाज आणि कुमार यांची कार्यशैली या मुद्द्यांवरून देशभरात वादळ उठले आहे. त्या मुद्द्यांवरून कॉंग्रेस अधिक आक्रमक बनल्याचे दिसून येत आहे.





