Bhor News: भोर तालुक्यातील मतदारांनो लक्ष द्या! मतदार गणना फॉर्म भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
Bhor News: २४ ऑगस्टला प्रसिद्ध होणार मतदार यादीचा प्रारूप मसुदा; दावे आणि हरकतींनंतर २७ ऑक्टोबरला अंतिम यादी होणार जाहीर.

Bhor News – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमे’ला निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता बीएलओमार्फत घरोघरी जाऊन मतदार गणना फॉर्म भरून घेण्याचे काम १७ ऑगस्टपर्यंत चालणार असून, अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.
हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन आणि उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी केले आहे. विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार बीएलओ यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम १७ ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्रांचे तर्कसंगतीकरण व पुनर्रचना १७ ऑगस्ट २०२६ रोजी पूर्ण करण्यात येईल.
मतदार यादीचा प्रारूप मसुदा २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी आणि निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पार पडेल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तहसीलदार राजेंद्र नजन यांनी स्पष्ट केले.
“विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेसाठी आयोगाने मुदतवाढ दिली आहे. या कामात भोर तालुका अग्रेसर असून बहुतांश काम पूर्ण झाले आहे. उर्वरित नागरिकांनी १७ ऑगस्टपर्यंत बीएलओंकडून मतदार गणना फॉर्म भरून घ्यावा.”
– राजेंद्र नजन, तहसीलदार, भोर.
“एकही पात्र मतदार सुटणार नाही आणि एकही नाव दुबार राहणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जात आहे. मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित व दुबार नावांची खात्री करून ‘नमुना ७’ नुसार ती वगळण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे. यामुळे मतदार यादी अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल.”
– डॉ. विकास खरात, उपविभागीय अधिकारी, भोर.





