गरिबांनाही करता येईल गुंतवणूक, लवकरच 250 रुपयांची SIP येणार – सेबी प्रमुख

मुंबई – शेअर बाजार आणि शेअर बाजार नियंत्रककासोबत म्युच्युअल फंड कंपन्या काम करीत आहेत. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणूक करता यावी याकरिता 250 रुपयांपर्यंतच्या कमी हप्त्याची एसआयपी लवकरात गुंतवणूकदारांना उपलब्ध होण्याची शक्यता वाढली आहे.
शेअर बाजार नियंत्रक मधाबी पुरी बुच यांनी भारतीय उद्योग महासंघाने या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. या विषयावर विविध संघटनादरम्यान अनेक वर्षापासून चर्चा चालू आहे. भारतात म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढत आहे. त्यातल्या त्यात एसआयपीच्या माध्यमातून मध्यमवर्गीय लोक बरीच गुंतवणूक करीत आहेत. मात्र फार कमी उत्पन्न असलेल्या वर्गाला या गुंतवणूक उत्पादनाचा उपयोग होत नाही. त्यासाठी 250 रुपये इतक्या कमी किमतीची एसआयपी उपलब्ध करण्यासंदर्भात काम चालू होते. आता हे काम पूर्णत्वास आले असून लवकरच याची अंमलबजावणी केली जाईल असे संकेत त्यांनी दिले.
सध्या बर्याच कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात नोंदले जात आहेत. त्यातल्या त्यात छोट्या कंपन्यांच्या आयपीओची संख्या वेगाने वाढत आहे. मात्र ह्या आयपीओची माहिती इंग्रजीत असते आणि ती गुंतागुंतीचे असते. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना ही माहिती कळत नाही. लवकरच ही माहिती स्थानिक भाषेत उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांसाठी आणि कंपन्यासाठी समृद्धी निर्मिती व्हावी याकरिता सेबी विविध उपाय योजनावर विचार करीत आहे. शेअर बाजारात नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. यामुळे गुंतवणूकदाराबरोबरच शेअर बाजाराचा आणि नियंत्रकांचाही फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कंपन्याची माहीती एकदाच अपलोड –
सध्या शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांना वेगवेगळ्या शेअर बाजारावर आपली माहिती उपलब्ध करावी लागते.त्यामुळे या कंपन्यांचा वेळ जातो. आता एखाद्या कंपनीने एखाद्या शेअर बाजाराला ही माहिती कळविली की ताबडतोब ती माहिती दुसर्या शेअर बाजारालाही उपलब्ध होईल. त्यासाठी वेगळी माहिती अपलोड करावी लागणार नाही. शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांना त्यांच्या संदर्भातील विविध घडामोडीची माहिती शेअर बाजारांना कळवावी लागते. त्या माहितीच्या आधारावर गुंतवणूकदार आपले गुंतवणुकीचे निर्णय घेत असतात. आता सर्व माहिती सर्व शेअर बाजारांना एकदाच कळणार असल्यामुळे ही माहिती गुंतवणूकदारापर्यंत लवकर पोहोचू शकेल.




