Pune News | सिंहगड रस्ता उड्डाण पूल आजपासून खुला

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल (sinhagad road flyover pune) प्रकल्पातील अखेरचा पूल आज सोमवार दि . १ सप्टेंबर २०२५ रोजी पुणेकरांच्या सेवेत दाखल होत आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या सिंहगड रस्त्यावरील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवा काशीद चौक ते हिंगणे दरम्यान बांधलेल्या या उड्डाणपुलाचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
वारंवार उद्घाटन लांबणीवर पडत असल्याने नागरिकांमध्ये कमालीची नाराजी होती. मुख्यमंत्री सोमवारी शहरातील गणपती मंडळांना भेटी देणार आहेत. याच दरम्यान, दुपारी ३ वाजता उद्घाटन होणार आहे. त्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांच्यासह प्रकल्प विभाग आणि पोलिसांनी पुलाची तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणाची रविवारी पहाणी केली.
सिंहगड रस्त्यावरची वाढती वाहतूक आणि दररोजची कोंडी लक्षात घेऊन राजाराम पूल ते फन टाइम थिएटर दरम्यान तीन उड्डाणपूल उभारण्यात आले. या प्रकल्पावर तब्बल ११८ कोटी खर्च झाला आहे. यातील दोन उड्डाणपुलांचे काम पूर्ण होऊन उद्घाटन झाले आहे. स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या तिसऱ्या उड्डाणपुलाचे उद्घाटन सोमवारी होत आहे.
(sinhagad road flyover ) या पुलाचे उद्घाटन सुरुवातीला १५ जूनला होणार असल्याची घोषणा झाली होती. त्यानंतर मुदत १५ , पुढे २५ ऑगस्ट अशी वाढवली गेली. प्रत्यक्षात पूल वाहतुकीसाठी खुला केला नाही. यामुळे सिंहगड रस्त्यावरील प्रवाशांमध्ये नाराजी होती.उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने विविध तपासण्या केल्या.
लोड टेस्ट घेऊन पुलाची वजन पेलण्याची क्षमता तपासली. याशिवाय गर्डरची मजबुती आणि सांधच्या गुणवत्तेचीही तपासणी झाली. एआयएल या त्रयस्थ संस्थेने दोन गर्डरला जोडल्या जाणाऱ्या भागावर प्लास्टर करू नका अशी सूचना केली होती. हे काम पूर्ण झाल्यानंतरही पूल उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होता.
सिंहगड रस्ता हा पुण्यातील सर्वाधिक वाहतुकीचा मार्ग आहे. विशेषतः सकाळ-संध्याकाळी गर्दीच्या वेळी वाहनचालकांना तासन्तास कोंडीत अडकावे लागते. नवीन उड्डाणपूल सुरू झाल्यामुळे शिवा काशीद चौक ते हिंगणे दरम्यानच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना आता सरळ व जलद मार्ग उपलब्ध होईल.हा उड्डाणपूल सुरू झाल्याने सिंहगड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल, असा प्रशासनाचा दावा आहे.




