Satara: जिल्ह्यात एकल महिलांना मिळणार योजनांचा लाभ! बचत गटात समावेशन; ‘उमेद’ अभियानांतर्गत महत्त्वपूर्ण टप्पा
Satara संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेल्या २३ जून या आंतरराष्ट्रीय विधवा दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून व प्रकल्प संचालक विश्वास सिद यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १९ ते २२ जून या कालावधीत जिल्ह्यामध्ये एकल महिलांचे बचत गटामध्ये समावेशन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.

Satara: जिल्हा परिषदेच्यावतीने ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) अंतर्गत जिल्ह्यातील एकल महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेतून जिल्ह्यातील ५९ हजार २०४ एकल महिलांना बचत गटांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या महिलांना आता विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेल्या २३ जून या आंतरराष्ट्रीय विधवा दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून व प्रकल्प संचालक विश्वास सिद यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १९ ते २२ जून या कालावधीत जिल्ह्यामध्ये एकल महिलांचे बचत गटामध्ये समावेशन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सर्व तालुक्यातील उमेद अभियानात कार्यरत तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक, गावस्तरावर कार्यरत सर्व ग्रामसखी यांनी १३ हजार ७७४ महिलांचे समावेशन बचत गटामध्ये केले. आजअखेर महिला बचत गटांमध्ये ५९ हजार २०४ एकल महिला समाविष्ट असल्याबाबतची माहिती याशनी नागराजन यांनी दिली.
महिला बचत गटात समाविष्ट झाल्यामुळे या एकल महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. उमेद अभियानामार्फत एकल महिलांच्या समावेशनासाठी केलेल्या कामाबाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, शिक्षण व अर्थ सभापती तेजस्विनी कदम, महिला व बाल कल्याण सभापती ऋतुजा शिंदे,समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती सौ. लता कर्णे यांनी कौतुक केले. ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे, जिल्हा व्यवस्थापक स्वाती मोरे, मनोजकुमार राजे व संजय निकम यांनी परिश्रम घेतले.
तालुकानिहाय समाविष्ट एकल महिलांची संख्या
• कराड – ९,३३६
• खटाव – ८,९४३
• सातारा- ८,१४०
• पाटण – ६,५१४
• फलटण – ६,४१८
• कोरेगाव – ३,७८३
• जावली: – ३,६३८
• खंडाळा – ३,४६१
• माण – ४,३२२
• वाई – २,९३४
• महाबळेश्वर – १,७१५





