Bihar Assembly Election | गायिका मैथिली यांना ‘अलीपूर’मधून उमेदवारी, जाणून घ्या वय अन् इंस्टावरील फोलोअर्स?

Bihar election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपने एका वेगळ्या चेहऱ्याला उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकप्रिय लोकगायिका आणि भजन गायिका मैथिली ठाकूर यांना अलीनगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.
मैथिली ठाकूर, ज्यांच्या गाण्यांनी देशभरातील लाखो लोकांना मंत्रमुग्ध केले आहे, त्या आता राजकारणात पदार्पण करत आहेत. भाजपने त्यांच्या सोशल मीडिया लोकप्रियतेचा फायदा घेण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. मैथिलीचे वय अवघे २५ वर्षे असले तरी विधानसभा उमेदवार होण्यासाठीची किमान वयाची अट पूर्ण झाल्याने त्या पात्र ठरतात.
कोण आहेत मैथिली ठाकूर?
मैथिली ठाकूर यांचा जन्म २५ जुलै २००० रोजी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी गावात झाला. त्यामुळे २५ जुलै २०२५ रोजी त्यांनी २५ वर्षे पूर्ण केली. मूळ बिहारी असल्या तरी त्यांचे शिक्षण आणि संगोपन दिल्लीत झाले. लहानपणापासूनच संगीताची आवड असलेल्या मैथिलींनी दिल्लीतच शास्त्रीय संगीत आणि गायनाचे धडे घेतले.
त्यांचे वडील रमेश ठाकूर हे प्रसिद्ध संगीतकार आहेत, तर दोन भाव रिषभ ठाकूर आणि आयाची ठाकूर हेही गायक आहेत. कुटुंबात शास्त्रीय संगीत, मैथिली आणि भोजपुरी लोकगीतांचे वातावरण असल्याने मैथिलींनी लहान वयातच संगीताची सुरुवात केली.
मैथिलींनी अवघ्या १२ वर्षी यूट्यूब चॅनेल सुरू केला आणि मैथिली-भोजपुरी गाणी अपलोड करण्यास सुरुवात केली. २०१७ मध्ये ‘रायझिंग स्टार’ या रिअॅलिटी शोमध्ये उपविजेतेपद मिळवल्यानंतर त्यांची प्रसिद्धी वाढली. त्यांनी मैथिली लोकगीतांबरोबरच हिंदी, भोजपुरी आणि भक्तिगीते गायली आहेत. २०२१ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार’ मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या ‘मां शबरी’ भजनाची प्रशंसा केली होती.
सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स
मैथिली ठाकूर हा सोशल मीडियावरील एक मोठा चेहरा आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी सोशल मीडियाद्वारे लाखो लोकांपर्यंत पोहोच केली आहे. त्यांचा यूट्यूब चॅनेलवर ५१ लाखपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत, तर इन्स्टाग्रामवर ६३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या भावांसोबत गायलेल्या एका व्हिडिओने व्हायरल होऊन त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आता राजकारणात उतरताना ही लोकप्रियता भाजपला तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल, असे पक्षातील नेते म्हणतात.
राजकारणातील एंट्री
मैथिली ठाकूर या १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाटण्यात भाजपमध्ये सामील झाल्या. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाने बिहारचा विकास बघून प्रभावित झाल्या आणि राज्याच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची इच्छा आहे.
भाजपने १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुसऱ्या यादीत मैथिलींना अलीनगर मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले. मधुबनी जिल्ह्यातील हे मतदारसंघ त्यांच्या मूळ गावाशी जवळीक असल्याने हे ठिकाण योग्य ठरले. मैथिलींच्या कुटुंबाने १९९५ मध्ये लालू प्रसाद यादव यांच्या काळात बिहार सोडला होता, आता विकासाच्या नावाने परतण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.





