सोलापूर (प्रतिनिधी) – सोलापूरात रविवारी सकाळी बाल लैंगिक शोषणाविरोधात जुना एम्प्लॉयमेंट चौकापासून “चुप्पी तोडो’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यावेळी “चुप्पी तोडो, चुप्पी तोडो, सोलापूरकर चुप्पी तोडो’ अशा घोषणांनी दणाणून गेला होता.
बाल लैंगिक शोषण ही समस्या एक संवेदनशील विषय म्हणून सर्वांत पुढे उभी आहे. या समस्येचा सामना करण्याचे, समाजामध्ये जनजागरण करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होत आहेत. लैंगिक शोषणासारख्या घटना चिमुकल्या मुलांच्या मनावर दूरगामी परिणाम करणाऱ्या असतात.
अशा घटना घडू नयेत यासाठी पालकांनी तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. याच उद्देशाने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. बाल लैंगिक शोषणासंदर्भात लोकांनी आपली चुप्पी तोडावी व एक मानसिकदृष्ट्या निरोगी समाज निर्माण करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.