पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहात पगडीधारीची एन्ट्री; गुरदीप सिंह यांनी घेतली खासदारकीची शपथ

इस्लामाबाद – पाकिस्तानमधील सत्ताधारी पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफचे नेते गुरदीप सिंह यांनी शुक्रवारी खासदार म्हणून शपथ घेतली. यासह ते पाकिस्तानच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील पहिले पगडीधारी शिख ठरले. सिंह यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत खैबर पख्तूनख्वा या अल्पसंख्याकांसाठी राखीव जागेवर प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला.
गुरमीत सिंह यांना या निवडणुकीत 145 पैकी 103 मते मिळाली. दुसरीकडे त्यांचे विरोधी उमेदवार जमीयत उलेमा-ए इस्लामचे (फजलुर) नेते रणजीत सिंह यांना केवळ 25 मते आणि अवामी नॅशनल पक्षाच्या आसिफ भट्टी यांना केवळ 12 मते मिळाली. सिंह यांच्याशिवाय पाकिस्तानच्या संसदेत आणखी 47 खासदारांनी शुक्रवारी पदाची शपथ घेतली. सिंह पाकिस्तानमधील स्वात जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते पाकिस्तानच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील पहिले पगडीधारी शिख ठरलेत.
शपथ घेतल्यानंतर सिंह म्हणाले, मला देशातील अल्पसंख्यांक समुहाच्या विकासासाठी काम करायचे आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचा प्रतिनिधी या नात्याने मला या समुहाची सेवा करण्याची संधी नक्की मिळेल. याआधी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अल्पसंख्यांक उमेदवारांची 5 मते नाकारण्यात आल्याची माहिती दिली होती.





