Sikandar Shaikh : सिकंदर शेखनं गंगावेश तालमीची अब्रू घालवली, अटकेनंतर वस्तादांचा संताप

Sikandar Shaikh : पंजाब पोलिसांनी आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख याला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केल्यानं कुस्ती विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. राजस्थानमधील कुख्यात पपला गुर्जर गँगशी त्याचे संबंध असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सिकंदरला रंगेहाथ पकडल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
सिकंदरनं कुस्तीचे धडे गिरवलेल्या मुंबईतील प्रसिद्ध गंगावेश तालमीतील वस्तादांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ पैलवान आणि हिंदकेसरी दीनानाथ सिंग यांनी म्हटलं, “सिकंदरनं तालमीची आणि लाल मातीची अब्रू घालवली.
तो खरा महाराष्ट्र केसरी नव्हे. पैशांसाठी असं करणं म्हणजे कुस्तीचा अपमान आहे. वस्तादाचं न ऐकणाऱ्या या पैलवानानं कुस्तीचं नाव खराब केलं.” वस्तादांच्या या शब्दांतून संताप स्पष्ट दिसत आहे.
दुसरीकडे, सिकंदरच्या कुटुंबियांनी त्याला निर्दोष ठरवत हा गोवण्याचा कट असल्याचा आरोप केला. सिकंदरचे वडील आणि पैलवान रशीद शेख म्हणाले, “मी आयुष्यभर हमाली केली, कधी हरामाचा पैसा कमावला नाही, तर माझा मुलगा कसा हरामाची कमाई करेल?
शेकडो गदा, गाड्या, लष्करात नोकरीची संधी मिळाली होती. त्याला असं काही करायची गरज नव्हती. हिंदकेसरी स्पर्धा जवळ आलीय, तो तयारी करत होता. सिकंदरला खेळू न देण्यासाठीच हा डाव आहे का?” चौकशीत सत्य समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सिकंदरनं आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं असून, महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली आहे. या गंभीर आरोपांमुळे कुस्तीक्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे.





