पुणे जिल्हा | मंचर बाजार समितीत बटाटा वाणाच्या मागणीत लक्षणीय घट

मंचर, (प्रतिनिधी) – देशात सर्व बाजारपेठेत बटाट्यास चांगला भाव मिळत असूनही व यंदा राज्यात भरपूर पाउस होऊनही बटाटा वाणाच्या मागणीत गत तीन वर्षीचे तुलनेत लक्षणीय घट आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत येथे दिसून येते आहे. हवामान बदल, शेतीला विश्रांती नसल्याने उत्पादनात घट होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या वर्षी पुणे जिल्ह्यात बटाटा हंगाम ऑगस्ट २०२४ चे पहिल्या आठवड्यापासून सुरू झाला आहे. नवा बटाट्यास चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने तरूण शेतकरी वर्गाकडून बटाटा लवकर बाजारात आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आगाद म्हणजेच पूर्व हंगामी बटाटा लागवड या ठिकाणी अलिकडचे काळात मोठ्या प्रमाणात होत आहे.
गेले आठ, दहा वर्षांत कांदा हे हमखास पैसे मिळवून देणाऱे पीक घेण्यासाठी व इतर ठिकाणचे बटाटा उत्पादकांपेक्षा येथील बटाट्यास जास्त भाव मिळण्याच्या अपेक्षेने लवकर बटाटा लागवड करून राज्यातील व देशातील इतर विभागातील लागवडीचे आधी आपलेच बटाटा पीक बाजारात आणण्यासाठी हंगाम पूर्व बटाटा लागवड गेले काही वर्षांत येथे वाढली आहे.
सप्टेंबरनंतर पूणे विभागातील बटाटा लागवड अतिशय कमी प्रमाणात होत आहे. परंतु बेभरवशाच्या वातावरणात हवामान बदलांचा धोका पत्करून या कालावधीत उत्पादन कमी येत असूनही या भागात बटाटा लागवडीकडे तरूण शेतकऱ्यांचा कल उत्तर पुणे जिल्ह्यात वाढला आहे.
परंतु हवामानाचे लहरीपणामुळे व उष्ण हवामानात बटाटा लागवड वाढल्याने तसेच सिंचन सुविधा व कायम स्वरुपी शेतीचे पाण्याची उपलब्धता झाल्याने येथील कसत असलेल्या शेतीमध्ये दोन पिकात योग्य कालावधीचे अंतर ठेवले न गेल्याने व एकाच वर्षात जास्त पिके घेण्याचे पध्दती वाढल्याने पुणे जिल्ह्यात बटाटा उत्पादन कमी कमी होत असल्याने आपल्या शेतात पूर्वी बटाटा ज्या प्रमाणात उत्पादीत होत होता तसा पूर्वीसारखा आता येत नाही.
असा समज येधील बहुसंख्य तरुण व मध्यमवयीन शेतकरी वर्गाचा झाल्यामुळे या बटाटा लागवडीमध्ये बटाट्याचा आगार समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ,सातारा जिल्हा व संगमनेर, अकोला, पारनेर या पश्चिम नगर जिल्ह्यात बटाटा पिकात अलिकडे मोठी घट झाली आहे.
गेले वीस-पंचवीस दिवसांत मध्यप्रदेशातील इंदोर परिसरात अर्ली हंगामात लावलेला बटाटा मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नष्ट झाल्याने तसेच खरीप हंगामातील सातारा व पुणे आणि नगर जिल्ह्यातील व कर्नाटक राज्यातील लागवड झालेल्या बटाटा पिक काढणीमध्ये या हंगामात सलग ढगाळ हवामान राहील्यामुळे तसेच काढणी काळात झालेल्या प्रचंड पावसामुळे खरीप हंगामातील बटाटा उत्पादन अतिशय घटले आहे.
खरीप हंगामातील शेतकरी अडचणीत आहेत व रब्बी हंगामातील महाराष्ट्रातील आतापर्यंतची आगाद बटाटा लागवड मोठ्या प्रमाणात घटल्याने संपूर्ण देशात नवा बटाटा बाजारात येण्यास मोठा गॅप तयार होणार आहे.
यामुळे महाराष्ट्रातील अल्प प्रमाणात लागवड झालेल्या बटाटा उत्पादकांना चांगला भाव मिळण्याची शक्यता वरील परिस्थितीमुळे निर्माण झाली आहे.
अशी माहिती येथील मंचर बाजार समितीचे माजी सदस्य व आडत व्यापारी स़ंघटनेचे पदाधिकारी संजय मोरे, मंचर आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष पोखरकर यांनी दिली.
पंजाब वाण…
या वर्षी सध्या मंचर मार्केटमध्ये दर्जेदार पंजाब बटाटा वाणाचे भाव मोठी साईज गोळी बटाटा ३००० पासून लहान साईजचा बटाटा ३५०० पर्यंत प्रति क्विंटल असा आहे व पंजाबचे कमी प्रतीचे व इतर राज्यातील बटाटा गोळी वाणाचे दर २६०० ते २९०० प्रति क्विंटल, असे आहेत.
उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील कोल्ड स्टोअरमधील बटाटा राज्यातील बाजारपेठेत येत असून किरकोळ बाजारात उपलब्ध होत असलेल्या बटाट्याच्या भावाचे मानाने येथील बाजारपेठेत या वर्षीचे बाजारभाव २०२० पेक्षा अतिशय वाजवी आहेत.
तरीही मागणी अतिशय कमी आहे, अशी माहिती मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.
येथील मंचर बाजार समितीत आमचे प्रतिनिधींनी भेट दिली असता येथील आडतदारांना अपेक्षा आहे की, देशात सहा सात राज्यांत व महाराष्ट्रातही कांदा पीक घेण्याकडे प्रचंड ओघ असल्याने बटाट्याचे सध्याचे चढे किरकोळ विक्रीचे बाजार भाव भविष्यात टिकून राहतील,
देशात पुढील काही महिने नवा बटाटा बाजारात येण्यास विलंब होणार असल्याने बटाट्याचे भाव दिर्घकाळ टिकून राहतील व बटाटा पिकास चांगला भाव मिळत राहणार असल्याने या वर्षी पर्जन्यमान चांगले राहिल्याने राज्यात शेतीचे भरपूर पाणी उपलब्ध असल्याने या वर्षीचे दसरा ते डिसेंबर अखेरपर्यंत बटाटा वाणास राज्यभरातून पुढे चांगली मागणी राहून येथील बाजार पेठेत एकुण बटाटा विक्री वाढेल अशी शक्यता दिसत आहे.
अशी माहिती येथील मंचर बाजार समितीचे माजी सदस्य व आडत व्यापारी स़ंघटनेचे पदाधिकारी संजय मोरे यांनी दिली.





