सिद्धू यांची नाराजी दूर? कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता

चंडीगढ – पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्या भेटीनंतर कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची नाराजी दूर झाल्याचे समजते. त्यामुळे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी सिद्धू कायम राहण्याची शक्यता बळावली आहे.
सिद्धू यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे पंजाबमध्ये सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेसपुढे मोठाच पेचप्रसंग उद्भवला. कलंकित अधिकारी आणि मंत्र्यांच्या नियुक्तीवरून सिद्धू नाराज असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर चन्नी यांनी सामंजस्याची भूमिका घेत सिद्धू यांना चर्चेचा प्रस्ताव दिला. त्यानुसार, दोघांची गुरूवारी बैठक झाली. त्यामध्ये पंजाबच्या नव्या पोलीस प्रमुखांना हटवण्याची सिद्धू यांची एक मागणी मान्य करण्यात आल्याचे समजते.
चन्नी आणि सिद्धू बैठकीनंतर हसत-हसतच बाहेर पडले. त्यामुळे सिद्धू यांची मनधरणी करण्यात चन्नी यांना यश आल्याचे मानले जात आहे. सिद्धू यांची नाराजी दूर झाल्याचे सूतोवाचही पक्षाच्या सुत्रांकडून करण्यात आले.
अर्थात, कॉंग्रेस किंवा सिद्धू यांच्याकडून रात्री उशीरापर्यंत कुठली औपचारिक माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे पेचावर नेमका काय तोडगा निघाला याची तूर्त प्रतीक्षा करावी लागणार आहे.





