Siddhivinayak Ganpati : श्री सिद्धिविनायक मंदिरात आजपासून गाभारा दर्शन बंद; जाणून घ्या कारण…

Siddhivinayak Ganpati | Mumbai : मुंबईतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सिद्धिविनायक गणपती मंदिर आज (बुधवार) पासून ते रविवारपर्यंत पुढील पाच दिवसांसाठी बंद राहणार आहे. या सिद्धिविनायक मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी साकडे घालतात.
परंतु येत्या ११ ते १५ डिसेंबर या पाच दिवसांसाठी सिद्धिविनायक मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. श्रींच्या प्रतिमेचे दर्शन भाविकांना १६ डिसेंबरपासून घेता येणार आहे. श्री सिद्धिविनायकाचे सिंदूर लेपन करण्यात येणार आहे.
त्यामुळे या काळात मंदिरातील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद राहणार आहे. परंतु, भाविकांना गाभाऱ्या बाहेरून श्रींच्या प्रतिमूर्तीचे दर्शन दिले जाईल. या काळात मंदिरातील सर्व नित्य धार्मिक कार्यक्रम नेहमीच्या वेळेवर सुरू राहतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
सोमवार, दिनांक १६ डिसेंबर २०२४ या दिवशी गाभाऱ्यामध्ये स्थलशुद्धी प्रीत्यर्थ उदकशांत आणि प्रोक्षण विधी हा धार्मिक विधी होईल. त्यानंतर श्रींची महापूजा, नैवद्य आणि आरती झाल्यानंतर दुपारी 1 वाजल्या पासून भाविकांना गाभाऱ्यातून दर्शन दिले जाईल.
दरम्यान, भारतात अनेक मोठी आणि प्राचीन गणपती मंदिरे आहेत. सर्वात प्रसिद्ध गणेश मंदिरे महाराष्ट्रात आहेत. यापैकी एक मुंबईत आहे जिथे लोक लांबून येतात. सेलिब्रिटीही या मंदिराला भेट देतात. येथे श्रीगणेशाचे दर्शन व पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. त्यामुळे या मंदिराचे नाव “सिद्धिविनायक मंदिर” आहे.





