Satara: ‘श्याम बेनेगल’ पुस्तकाचा विविध भाषांत अनुवाद करावा; भारत सासणे
Satara बेनेगल यांच्या चित्रपटातील स्त्री आणि तिची बंडखोर वृत्ती यावर ज्येष्ठ पर्यावरणवादी लेखिका ॲड. सीमंतिनी नुलकर यांनी प्रकाश टाकला.

Satara: ‘‘श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांमध्ये ग्रामीण भारतातील सरंजामशाही, जातीयवाद, महिलांचे शोषण आणि मानवी हक्कांचे प्रश्न प्रकर्षाने मांडले गेले आहेत. लेखिका डॉ. सविता नायक- मोहिते यांनी ‘श्याम बेनेगल: एक व्यक्ती एक दिग्दर्शक’ या पुस्तकातून त्यांच्या या वैशिष्ट्यांवर योग्य प्रकाश टाकला असून, हे आशयघन पुस्तक नवोदित दिग्दर्शकांसाठी एक उत्तम शैक्षणिक मार्गदर्शक ठरेल,” असे मत ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केले. बेनेगल यांच्या दिग्दर्शकीय प्रवासाचा पट बहुभाषिक वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पुस्तक इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषांमध्ये अनुवादित करून प्रकाशित करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी लेखिकेला दिला.
येथील आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दीपलक्ष्मी सभागृहात या पुस्तकाविषयी चर्चासत्र झाले. अध्यक्षीय समारोपात श्री. सासणे बोलत होते. ज्येष्ठ लेखक प्रा. बाळासाहेब लबडे यांनी बेनेगल यांच्या चित्रपटांमागची भूमिका उलगडताना ‘अंकुर’, ‘निशांत’, ‘मंथन’, ‘सरदारी बेगम’ आदी चित्रपटांचा विस्तृत आढावा घेतला. शबाना आजमी, नसिरुद्दीन शाह, स्मिता पाटील यांसारख्या कसदार कलावंतांना घडवण्यामध्ये बेनेगल यांची मोठी भूमिका होती, असे प्रा. लबडे यांनी नमूद केले.
बेनेगल यांच्या चित्रपटातील स्त्री आणि तिची बंडखोर वृत्ती यावर ज्येष्ठ पर्यावरणवादी लेखिका ॲड. सीमंतिनी नुलकर यांनी प्रकाश टाकला. हे पुस्तक श्याम बेनेगल यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, कलादृष्टीचा आणि चित्रपटसृष्टीतील योगदानाचा अभ्यासपूर्ण वेध घेते, असे चित्रपट अभ्यासक श्रीराम नानल यांनी सांगितले. शिरीष चिटणीस यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा आढावा घेत श्याम बेनेगल यांच्या योगदानाचा भावपूर्ण उल्लेख केला.
डॉ. सविता नायक- मोहिते यांनी पुस्तक निर्मितीचा प्रवास सांगताना एका शैक्षणिक प्रकल्पाच्या निमित्ताने श्याम बेनेगल यांच्याशी झालेली पहिली भेट आणि त्यानंतर सुरु झालेली लेखनप्रक्रिया यावर प्रकाश टाकला. आम्ही डॉक्टर मंडळी एंडोस्कोपी, ईसीजी, एक्स- रे अशा विविध मार्गांनी रुग्णाचे शरीर तपासतो. पण त्याने माणसाचे ‘मन’ दिसत नाही. माणसाचे हे अंतरंग बघण्याचे आणि तपासण्याचे काम साहित्य करते, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘आम्ही पुस्तक प्रेमी समूहा’चे संस्थापक डॉ. संदीप श्रोत्री यांनी समूहाच्या उपक्रमांचा आढावा घेतला. सविता नायक-मोहिते यांचे हे पुस्तक दिग्दर्शकाच्या चित्रपटांचा आणि दिग्दर्शकीय भूमिकेचा तो एक सखोल शैक्षणिक अभ्यास आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. संदीप श्रोत्री यांनी भारत सासणे यांचे, श्रीराम नानल यांनी प्रा. बाळासाहेब लबडे यांचे स्वागत केले. लेखिका डॉ. सविता नायक-मोहिते, ॲड. सीमंतिनी नुलकर, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी यांचे स्वागत श्री. सासणे यांनी केले. सविता कारंजकर यांनी सुत्रत्रसंचालन करुन आभार मानले.





