Sachin Tendulkar : ‘बाह्य गोंधळ टाळा अन् संघावर…’, पहिल्या कसोटीपूर्वी सचिनने शुबमन गिलला दिला गुरुमंत्र

Sachin Tendulkar captaincy advice to Shubman Gill : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील पहिला कसोटी सामना २० जूनपासून लीडसच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात शुबमन गिल प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. या सामन्यापूर्वी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने शुबमन गिलला महत्त्वाचा गुरुमंत्र दिला आहे. सचिनने गिलला बाह्य गोंधळापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला दिला आहे.
सचिनने शुबमन गिलला दिला गुरुमंत्र –
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर निवड समितीने शुबमन गिलला या प्रारूपात पुढील कर्णधार म्हणून निवडले. आता सर्वांचे लक्ष गिलच्या कामगिरीकडे लागले आहे, की तो कर्णधार आणि फलंदाज म्हणून इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत कशी कामगिरी करतो. भारतीय संघाचे कर्णधारपद ही अत्यंत दबावपूर्ण जबाबदारी आहे, असे सचिन तेंडुलकरने भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात शुभमन गिल यांच्याबाबत सांगितले.
शुबमनला वेळ आणि पाठिंबा दोन्ही देण्याची गरज – सचिन तेंडुलकर
The two most capped players in Test cricket history…
Now with their very own trophy 😍🏆 pic.twitter.com/ovhFLETR4S
— England Cricket (@englandcricket) June 19, 2025
सचिन तेंडुलकर म्हणाला, “मला वाटते की शुबमनला वेळ आणि पाठिंबा दोन्ही देण्याची गरज आहे, कारण भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणे हे खूप दबावाचे काम आहे. तुमच्यासमोर अनेक प्रकारचे सल्ले येतील की, हे करा किंवा ते करा. त्याने फक्त संघासाठी काय आवश्यक आहे यावर लक्ष केंद्रित करावे. संघाच्या हिताचा विचार करून निर्णय घ्यावे लागतील.”
हेही वाचा – IND vs ENG : ‘ही चूक पुन्हा करु नका…’, पहिल्या कसोटीपूर्वी मोहम्मद कैफने टीम इंडियाला दिला महत्त्वाचा सल्ला
बाह्य गोंगाटाकडे लक्ष देण्याची गरज नाही –
सचिन तेंडुलकरने पुढे सांगितले की, “शुबमन गिलने कर्णधार म्हणून बाह्य गोंगाटाकडे लक्ष देण्याची गरज नाही. लोक आपली मते देत राहतील, पण शेवटी महत्त्वाचे आहे ते ड्रेसिंग रूममधील वातावरण कसे आहे आणि संघाच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले गेले, याशिवाय काहीही नाही.” दरम्यान, इंग्लंडमधील परिस्थितीबाबतही सचिनने भारतीय संघाच्या फलंदाजांना सल्ला दिला की, त्यांनी परिस्थितीनुसार रणनीती आखावी, कारण इथे तुम्ही असे खेळू शकत नाही की माझी खेळण्याची पद्धत अशी आहे आणि मी फक्त तसेच खेळेन. फलंदाजांना थोडा संयम दाखवावा लागेल.





