IND vs ENG : ‘ही चूक पुन्हा करु नका…’, पहिल्या कसोटीपूर्वी मोहम्मद कैफने टीम इंडियाला दिला महत्त्वाचा सल्ला

IND vs ENG Mohammad Kaif Warns Team India : भारत आणि इंग्लंड संघांत अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील पहिला कसोटी सामना लीड्स येथे २० जूनपासून खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे सज्ज दिसत आहे. दरम्यान या सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनवर जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र, या चर्चेत इंडिया ‘ए’ च्या कर्णधाराच्या नावाचा समावेश नाही. दरम्यान, माजी भारतीय खेळाडू मोहम्मद कैफने भारतीय संघ व्यवस्थापनाला महत्त्वाचा इशारा दिला आहे.
मोहम्मद कैफने भारतीय संघाला दिला महत्त्वाचा सल्ला –
मोहम्मद कैफच्या मते, भारतीय संघाने यापूर्वीच एक चूक केली आहे आणि आता लीड्स कसोटी सामन्यापूर्वी दुसरी चूक करू नये. भारतीय संघ व्यवस्थापनाने सर्फराझ खानला संघातून वगळले आहे. आता अभिमन्यू ईश्वरनलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता दिसत नाही. यासंदर्भात मोहम्मद कैफने सोशल मीडियावर मत व्यक्त करताना म्हटले, “अभिमन्यू ईश्वरनला साई सुदर्शनच्या आधी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यायला हवी. ईश्वरनच्या २७ प्रथम श्रेणी शतकांचा आणि जवळपास ८ हजार प्रथम श्रेणी धावांचा सन्मान व्हायला हवा.”
ईश्वरनला लीड्स कसोटीतून वगळून पुन्हा चूक करू नये – मोहम्मद कैफ
Abhimanyu Easwaran deserves to be in the playing XI before Sai Sudarshan. Easwaran’s 27 first-class hundreds, almost 8k FC runs need to be respected. By dropping Sarfraz, someone who scored runs for India A in England, selectors made a mistake. They shouldn’t repeat it by keeping…
— Mohammad Kaif (@MohammadKaif) June 19, 2025
मोहम्मद कैफ पुढे म्हणाला, “सर्फराझ खानला संघातून वगळून निवड समितीने एक मोठी चूक केली आहे. आता ज्याने इंग्लंडमध्ये इंडिया ‘ए’ साठी धावा केल्या आहेत, त्या ईश्वरनला लीड्स कसोटीतून वगळून ही चूक पुन्हा करू नये.” इंडिया ‘ए’चा कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने नुकत्याच इंग्लंड लायन्सविरुद्ध ६८ आणि ८० धावांच्या खेळी साकारून आपले कौशल्य सिद्ध केले आहे.”
हेही वाचा – कसोटी क्रिकेटच्या इतिहासात नवी भर! आता ‘या’ नावाने ओळखली जाणार IND vs ENG मालिका
अभिमन्यू ईश्वरनची दमदार कामगिरी –
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत अभिमन्युने १०३ सामन्यांमध्ये ४८.७० च्या सरासरीने ७८४१ धावा केल्या आहेत. यात त्याने २७ शतके आणि ३१ अर्धशतके झळकावली आहेत. अभिमन्यू अनेकदा भारतीय कसोटी संघात पदार्पणाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे, परंतु विविध कारणांमुळे त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. या इंग्लंड दौऱ्यावर ईश्वरनला कसोटी पदार्पणाची सुवर्णसंधी आहे.





