Shubman Gill : शुबमन गिलने ICC चा खास पुरस्कार जिंकत रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा पहिलाच भारतीय

ICC Mens Player of the Month Award for February 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर, भारताचा सलामीवीर शुबमन गिल खूप आनंदी आहे. आयसीसीने बुधवारी गिलला महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार दिला. फेब्रुवारी महिन्यात त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ घोषित करण्यात आले. गिलने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सला मागे टाकत हा पुरस्कार जिंकला. यासह त्याने इतिहास रचला आहे.
शुबमन गिलने रचला इतिहास –
शुबमन गिलने तिसऱ्यांदा आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ हा पुरस्कार जिंकत इतिहास रचला आहे. खरं तर, गिल हा सर्वात जास्त वेळा ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार जिंकणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने एकूण यादीत पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमची बरोबरी केली आहे. बाबरने पण आतापर्यंत तीन वेळा ‘प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे. २५ वर्षीय गिलने गेल्या महिन्यात पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये १०१.५० च्या सरासरीने आणि ९४.१९ च्या स्ट्राईक रेटने ४०६ धावा केल्या.
फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताच्या ३-० अशा विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्यामध्ये त्याने दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावले होते. नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ८७, कटकमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात ६० आणि अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ११२ धावा केल्या होत्या. यासह त्याने सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार जिंकला होता.
शुबमन गिलची चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरी –
त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही हा उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला. दुबई येथे झालेल्या भारताच्या पहिल्या सामन्यात गिलने बांगलादेशविरुद्ध १०१ आणि पाकिस्तानविरुद्ध ४६ धावांचे योगदान दिले. भारताचा उपकर्णधार आणि नंबर वन वनडे फलंदाज गिलने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाच सामन्यांमध्ये ४७.०० च्या सरासरीने एकूण १८८ धावा केल्या. गिलने यापूर्वी २०२३ मध्ये (जानेवारी आणि सप्टेंबर) दोनदा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला होता. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आतापर्यंत दोनदा हा पुरस्कार जिंकला आहे.
शुबमन गिल काय म्हणाला?
पुरस्काराबद्दल बोलताना शुबमन गिल म्हणाले, “फेब्रुवारी महिन्याचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकून मला खूप आनंद झाला आहे. फलंदाजाने चांगली कामगिरी करणे आणि माझ्या देशासाठी सामने जिंकणे, यापेक्षा मला प्रेरणा देणारे दुसरे काहीही नाही.” दरम्यान, ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू अलाना किंग हिला फेब्रुवारी २०२५ साठी आयसीसी महिला प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले.





