Shubman Gill No 1 : आयसीसी क्रमवारीत शुबमन गिलचा दबदबा! बनला जगातील नंबर-१ फलंदाज
Shubman Gill No 1 : कोणतीही मॅच न खेळता गिलला थेट नंबर-१ ची खुर्ची मिळाली आहे. त्याने न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलला पछाडत हे स्थान मिळवले.

Shubman Gill ICC ODI Batting Ranking No 1 Rohit Virat Daryl Mitchell : भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि वनडे कर्णधार शुबमन गिलने आयसीसीच्या ताज्या फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, कोणतीही मॅच न खेळता गिलला थेट नंबर-१ ची खुर्ची मिळाली आहे. त्याने न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलला पछाडत हे स्थान मिळवले. सध्या जाहीर झालेल्या टॉप-५ फलंदाजांच्या यादीत तीन भारतीय खेळाडूंनी आपले वर्चस्व राखले आहे.
डॅरिल मिचेलला फटका, शुबमन गिलचा फायदा!
इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताचा १-२ असा पराभव झाला असला, तरी शुबमन गिलने बॅटने शानदार कामगिरी केली होती. २२ जुलैच्या रँकिंगमध्ये तो दुसऱ्या स्थानावर होता. दरम्यान, न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिचेल वेस्ट इंडिजविरुद्धच्या ५ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दोन सामन्यांत खेळला नाही. यामुळे त्याचे रेटिंग पॉईंट्स ८०२ वरून ७९४ वर घसरले आणि तो दुसऱ्या स्थानावर फेकला गेला. याचा थेट फायदा गिलला झाला आणि तो ८०१ रेटिंग पॉईंट्ससह जगातील नंबर-१ वनडे फलंदाज बनला. या यादीत विराट कोहली (७६७ पॉईंट्स) तिसऱ्या, तर रोहित शर्मा (७५८ पॉईंट्स) चौथ्या स्थानावर काबीज आहे.
कसोटी रँकिंग सुधारण्याची गिलकडे सुवर्णसंधी!
Shubman Gill at No. 1️
Virat Kohli at No. 3️
Rohit Sharma at No. 4️Three Indian batters in the Top 4 of the ICC ODI Batting Rankings. 🇮🇳🔥
This says it all about India’s top-three dominance in ODI cricket. pic.twitter.com/GHKcQhyh5k
— Sonu (@Cricket_live247) July 29, 2026
भारतीय संघाला आता आपली पुढील मालिका कसोटी स्वरूपात खेळायची आहे. १५ ऑगस्टपासून भारताचा श्रीलंका दौरा सुरू होत असून, येथे दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. कर्णधार शुबमन गिलकडे या मालिकेत आपली कसोटी रँकिंग सुधारण्याची मोठी संधी असेल. सध्या तो ७४३ रेटिंग पॉईंट्ससह ७ व्या स्थानावर आहे. या यादीत भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल ७३३ पॉईंट्ससह ९ व्या स्थानावर आहे.
अभिषेक शर्माला मोठा धक्का –
टी-२० क्रमवारीत इशान किशन अव्वल स्थानी कायम आहे. झिम्बाब्वे मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरलेला अभिषेक शर्मा एका स्थानाने घसरून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. पाकिस्तानचा साहिबजादा फरहान दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयसीसी क्रमवारीत भारतीय संघाचे वर्चस्व आहे. वनडे आणि टी-२० या दोन्ही प्रकारांमध्ये संघ अव्वल स्थानी आहे. कसोटीत भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे.





