Shubhanshu Shukla: अंतराळात शरीराचे काय हाल होतात? शुभांशू शुक्लांनी उलगडले ‘झिरो ग्रॅव्हिटी’चे गुपित

प्रभात वृत्तसेवा
पुणे – आकाश ही कधीच मर्यादा नव्हती आणि नसेल! भारत २०४० मध्ये चंद्रावर उतरण्याची तयारी करत आहे आणि तिथे पडणारे पहिले पाऊल तुमच्यापैकी कोणाचे तरी असू शकते. सातत्यपूर्ण प्रयत्न, चिकाटी आणि कठोर परिश्रमातून हे स्वप्न सत्यात उतरवा, अशा शब्दांत प्रसिद्ध अंतराळवीर आणि भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी युवा पुणेकरांच्या स्वप्नांना जिद्दीचे ‘अग्निपंख’ दिले.
पुणे पुस्तक महोत्सवानिमित्ताने आयोजित संवाद सत्रात ते बोलत होते. ‘ऍक्सिऑम-४‘ या मोहिमेद्वारे जून २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवून भारताची मान उंचावणाऱ्या शुक्ला यांनी या वेळी आपल्या मोहिमेचे थरारक अनुभव मांडले. राकेश शर्मा यांच्यानंतर ४१ वर्षांनी अंतराळात प्रवेश करून इतिहास रचणारे दुसरे भारतीय ठरलेल्या शुक्ला यांच्याशी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे (एनबीटी) संचालक युवराज मलिक यांनी संवाद साधला.
याप्रसंगी ‘एनबीटी’चे अध्यक्ष मिलिंद मराठे, मुख्य संयोजक राजेश पांडे आणि कृष्णकुमार गोयल उपस्थित होते.शुक्ला म्हणाले, की पृथ्वीवर आपली ओळख शहर किंवा देश अशी असते, पण अंतराळात ‘पृथ्वी’ हीच एकमेव ओळख उरते. तिथून पाहताना सर्व एकच असल्याची वैश्विक भावना निर्माण होते. शून्य गुरुत्वाकर्षणामुळे शरीरात मोठे बदल होतात.
उंची वाढणे, भूक न लागणे आणि रक्ताचा प्रवाह डोक्याकडे सरकणे या गोष्टी सहन करण्यासाठी मनाचा निग्रह महत्त्वाचा असतो. प्रक्षेपणावेळी ‘वंदे मातरम’ हे गीत आपल्यासाठी ऊर्जेचा स्त्रोत ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे ‘विंग्स ऑफ फायर’ हे पुस्तक प्रेरणादायी ठरल्याचे सांगितले.
त्यांनी विद्यार्थ्यांना अपयशाने खचून न जाण्याचा सल्ला दिला, तसेच अंतराळवीरांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मायदेशातच मिळावे, यासाठी भारतात अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारले जात असल्याची महत्त्वपूर्ण माहितीही त्यांनी दिली.




